गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती पोलीस सक्षम, तलवारी, कोयत्यासह ७ घातक शस्त्रे जप्त; माळेगाव पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ.

0
9
0
6
5
0
बारामती : तालुक्यातील बारवनगर येथे माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत एका व्यक्तीकडून तब्बल ७ घातक शस्त्रे जप्त केली आहेत. दादा नथुराम शिंदे असे शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना पोलिसांचा मोठा दणका बसला आहे.
दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मौजे बारवनगर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. आरोपी दादा शिंदे (रा. बारवनगर, ता. बारामती) याच्या राहत्या घरासमोरील परिसरातून पोलिसांनी तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा आणि कुऱ्हाड असा विनापरवाना बाळगलेला घातक शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये तीन तलवारी (दोन स्टील व एक लोखंडी), एक लोखंडी कोयता, सत्तुर, सुरा आणि लोखंडी पाते असलेली कुऱ्हाड अशा एकूण १,६०० रुपये किमतीच्या ७ हत्यारांचा समावेश आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी विशेष कंबर कसली आहे.
जून २०२६ पासून पोलिसांनी केलेल्या धडक कारवायांमधून आतापर्यंत एकूण ४ अग्निशस्त्रे आणि १२ प्राणघातक हत्यारे जप्त केली आहेत. या कालावधीत एकूण ८ गुन्हे दाखल करून तब्बल १३ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.




