Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत ‘गांजा’ तस्कराच्या मुसक्या आवळल्या; रिंग रोडवर रात्रीच्या अंधारात सिनेस्टाईल थरार! पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

0 4 7 3 2 9

बारामती: रात्रीची वेळ… बोके हॉस्पिटलसमोरील शांत झालेला नवीन रिंग रोड… आणि अंधारात दबा धरून बसलेले पोलिसांचे विशेष पथक. एखाद्या चित्रपटातील दृश्याला शोभेल असा हा थरार २७ जानेवारीच्या रात्री बारामतीत घडला. बारामती शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

बारामती शहरात तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांच्या विरोधात बारामती शहर पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम उघडली आहे. मंगळवारी (दि. २७) रात्री पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत एक पक्की ‘टीप’ मिळाली. “एक तरुण मोटारसायकलवरून बोके हॉस्पिटल जवळील रिंग रोडवर गांजा विक्रीसाठी येणार आहे,” अशी ती माहिती होती.

क्षणाचाही विलंब न लावता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भंडारे यांनी आपले ‘स्पेशल पथक’ तयार केले. पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साध्या वेशात आणि अत्यंत सावधगिरीने रिंग रोड परिसरात सापळा लावला.

रात्री ११:०५ वाजता… थरारक अटॅक!

रात्रीचे सुमारे ११ वाजून ५ मिनिटे झाली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. तेवढ्यात एक संशयित दुचाकीस्वार तेथे आला. पोलिसांची नजर त्याच्यावर खिळली होती. तो सावज टप्प्यात येताच, इशारा मिळला आणि दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने चोहोबाजूंनी त्याच्यावर झडप घातली. त्या तरुणाला पळून जाण्याची पुसटशी संधीही पोलिसांनी दिली नाही आणि त्याला रंगेहाथ जेरबंद केले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपले नाव फरहान युसुफ शेख (वय २३, रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असल्याचे सांगितले. त्याच्या झडतीत पोलिसांना १ किलो ९८९ ग्रॅम (अंदाजे २ किलो) गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील ३९,७८० रुपये किमतीचा गांजा आणि ५०,००० रुपयांची हिरो स्प्लेंडर दुचाकी (MH16/DD/6374) असा एकूण जवळपास ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पो.उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे, पो.हवा. सुलतान डांगे, रामचंद्र शिंदे, पो.कॉ. वैभव मदने, राहुल बडे, गिरीश नेवसे, सागर जामदार आणि अक्षय सिताप या पथकाने मोलाची भूमिका बजावली.

आरोपीवर एनडीपीएस ॲक्ट (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, बारामती शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे