बारामती : बारामती शहर व तालुक्यात आगामी दहीहंडी व गणेशोत्सव शांततामय, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन आणि उत्सव मंडळांची भव्य समन्वय व मार्गदर्शन बैठक नुकतीच पार पडली. उत्सवाला पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील, मात्र ध्वनीप्रदूषण, कायद्याचे उल्लंघन आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या डीजेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा अत्यंत स्पष्ट आणि कडक इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिला आहे.
कविवर्य मोरोपंत हॉल, बारामती येथे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, सुपा आणि माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे ३०० ते ४०० गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार रावडे, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी एकाच मंचावर उपस्थित होते.
या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी देण्यात आली. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्या, रस्त्यावरील स्पीड ब्रेकर, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, वाहतूक नियोजन आणि मंडप व्यवस्था याबाबत मंडळांनी आपल्या अडचणी मांडल्या. यावर सर्व संबंधित विभागांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी स्पष्ट केले की, नगरपरिषदेशी संबंधित सर्व समस्या प्राधान्याने आणि तातडीने सोडविल्या जातील तसेच मंडळांना प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे डीजे आणि मोठ्या साऊंड सिस्टीमचा वापर. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत बजावले की, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव आहे. उत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश आवाज करून महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना त्रास देण्याचा कोणालाही अधिकार नाही. ध्वनीप्रदूषणाच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. परवानगी मिळाली म्हणजे अमर्याद आवाज करण्याची परवानगी मिळाली, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये.
ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास, केवळ अंदाजाने किंवा तक्रारीवरून कारवाई न करता, ध्वनीमापक यंत्रांच्या माध्यमातून आवाजाची प्रत्यक्ष मोजणी केली जाईल. उपलब्ध तांत्रिक साधनांच्या मदतीने ध्वनीपातळीची नोंद घेऊन, कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज आढळल्यास थेट पुराव्यावर आधारित कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियम मोडल्यास मंडळ किती मोठे आहे, याचा विचार न करता निष्पक्ष कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
डीजेच्या अतितीव्र आवाजामुळे श्रवणशक्तीवर होणारा परिणाम, डोकेदुखी आणि मानसिक ताण याकडे पोलिसांनी लक्ष वेधले. मोठा आवाज हे मंडळाच्या मोठेपणाचे प्रतीक बनवू नका, असे आवाहन करत पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा, लेझीम, आरती आणि भजनांना प्राधान्य देण्याची विनंती करण्यात आली. तसेच, मंडळांनी केवळ मनोरंजनावर भर न देता पर्यावरणपूरक उत्सव, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि महिला सुरक्षेसारखे सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
मंडप उभारणीमुळे रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांचा मार्ग अडवला जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही, अग्निशमन व्यवस्था आणि अधिकृत स्वयंसेवकांची नियुक्ती अनिवार्य करण्यात आली आहे. मिरवणुकीत मद्यपान करणे, धोकादायक शस्त्रांचे प्रदर्शन करणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मिरवणुकीसाठी ठरवून दिलेला मार्ग आणि वेळ पाळणे सर्व मंडळांवर बंधनकारक असेल.
कायदा पाळणाऱ्या प्रत्येक मंडळाला पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील. सर्वांनी मिळून सुरक्षित, शांततामय आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशन आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा