बारामती : बारामती शहर आणि परिसरात राजरोसपणे अवैध गावठी पिस्टल बाळगून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांचे बारामती शहर पोलिसांनी चांगलेच धाबे दणाणले आहेत. नव्याने पदभार स्वीकारलेल्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनिषा ओमासे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल ५ अवैध गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, ही सर्व शस्त्रे मध्य प्रदेशातून आणली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बारामती शहर परिसरात काही गुन्हेगार अवैध अग्नीशस्त्रे घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती श्रीमती मनिषा ओमासे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विशेष पथक तयार करून विविध ठिकाणी गोपनीय बातमीदार पेरले. या मोहिमेतील पहिला मोठा घाव २२ ऑक्टोबर २०२६ रोजी घालण्यात आला. टिसी कॉलेज परिसरात आदित्य चंद्रकांत शेलार (रा. आमराई, बारामती) याला ताब्यात घेऊन त्याच्या पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कारची (एमएच १२ युके ००७२) झडती घेतली असता, गाडीत एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्यावर आर्म अॅक्ट कलम ३ (२५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४७३/२०२६) दाखल करून सखोल तपास सुरू केला असता, हे पिस्टल मयुर विष्णू मोरे (रा. मेदड, बारामती) याने दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी मयुर मोरे याला अटक केली. त्याने हे शस्त्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून आणल्याची कबुली देताच बारामती पोलिसांच्या पथकाने वरिष्ठांच्या परवानगीने थेट शिरपूर गाठले. तिथे अत्यंत शिताफीने सापळा रचून २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री जांतीराम पावरा याला ताब्यात घेतले असता, त्याच्या अंगझडतीत आणखी दोन गावठी पिस्टल मिळून आली. या एकाच गुन्ह्यात पोलिसांनी एकूण ३ पिस्टल जप्त केली असून, याचा तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षिरसागर करत आहेत.
पोलिसांची ही धडक मोहीम इथेच थांबली नाही. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाजी चौक परिसरात कारवाई करत पोलिसांनी धीरज रविंद्र पडकर (रा. आमराई) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून, गुन्हा रजिस्टर नंबर ५३८/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करत आहेत. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलिसांनी निरा रोडवर सापळा रचून मंगेश सुभाष मदने (रा. भिमनगर, कसबा, बारामती) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडूनही एक गावठी पिस्टल आणि एक काडतुस हस्तगत करण्यात आले असून, गुन्हा रजिस्टर नंबर ५४२/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याचा तपासही पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षिरसागर करत आहेत.
अशा प्रकारे सलग कारवाया करत बारामती शहर पोलिसांनी एकूण ५ अवैध पिस्टल जप्त करून गुन्हेगारी जगताला मोठा दणका दिला आहे. परिसरात कोठेही अवैध धंदे किंवा अवैध शस्त्रांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनिषा ओमासे यांनी केले आहे.
ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मनिषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षिरसागर, शिंदे, पवार, झणझणे, कांबळे तसेच पोलीस शिपाई विजय ओमासे, प्रविण शिंगाडे आणि अक्षय शिताप यांच्या पथकाने केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा