Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सोमेश्वर कारखाना निवडणूक: ‘दादांचे विचार आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कपबशीला मतदान करा’; सांगता सभेत सुनेत्रा पवार यांचे आवाहन

0 9 4 8 2 6

सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजित दादा पवार पॅनेल’ची प्रचाराची सांगता सभा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे, माजी मंत्री व पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते व हजारो सभासद उपस्थित होते. या सभेत सर्वच नेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत अजित दादांच्या विकासकामांची आठवण करून दिली आणि पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.

सुनेत्रा पवार सभेतील प्रमुख आणि शेवटच्या भाषणात राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी अत्यंत ठाम आणि अभ्यासपूर्ण विचार मांडले. त्या म्हणाल्या की, कारखाना ही कोण्या एकाची मालमत्ता नसून ती मायबाप सभासदांची आहे आणि अजित दादांनी शेवटपर्यंत कारखान्याचे राखणदार म्हणून इमानेइतबारे काम केले. दादांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून कारखाना कर्जमुक्त केला, गाळप क्षमता ९५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आणि राज्यात सर्वाधिक ४००० रुपये प्रतिटन असा उच्चांकी दर दिला. विरोधकांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, काही लोकांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा कारखान्यासारख्या मोठ्या संस्थेचा ऱ्हास करू शकते. ज्यांना ‘हम करे सो कायदा’ करायचा आहे, अशा प्रवृत्तींपासून सावध राहण्याची गरज आहे.

भविष्यातील योजनांबद्दल बोलताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, सीबीजी (CBG) प्रकल्प, शेत पाणंद रस्ते (ज्यासाठी १८ कोटी मंजूर आहेत), आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आपले ध्येय आहे. दादांची राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि कारखान्याच्या सुरक्षित भविष्यासाठी सर्व मतदारांनी पॅनेल टू पॅनेल ‘कपबशी’ चिन्हावर शिक्का मारून मतदान करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

दरम्यान पुरंदरचे आमदार आणि माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. अजित दादांनी ज्यांना १३ वर्षे अध्यक्षपद दिले, त्यांनीच कृतघ्नपणे पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात त्यांनी केला. शिवतारे पुढे म्हणाले की, नीरा नदीजोड प्रकल्प आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाण्याची मोठी क्रांती झाली आहे आणि भविष्यात १००% शाश्वत बागायत करण्याचे दादांचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली हे पॅनेल १० हजार मतांच्या फरकाने विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दादांना श्रद्धांजली म्हणून केवळ ‘कपबशी’ला मतदान करा असे आवाहन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. अजित दादा नसताना ही कारखान्याची पहिलीच निवडणूक होत असून, वहिनींनी स्वतःच्या दुःखातून सावरून राज्याची आणि जनतेची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी व सभासदांनी गमतीजमती न करता, दादांनी केलेल्या उपकारांची जाण ठेवून केवळ ‘कपबशी’ चिन्हावरच शिक्का मारावा आणि दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी आपल्या भाषणात नव्या पिढीची आणि विकासाची संकल्पना मांडली. दादांनी आयुष्यभर जातीपातीचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण केले, तोच वारसा आपण पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे खरे मालक सभासद आहेत, त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी आर एफ आय डी (RFID) कार्ड बनवून कारखान्यात विनाअडथळा प्रवेशाची व्यवस्था करण्यात येईल, अशी नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी मांडली.

या सांगता सभेच्या माध्यमातून सर्वच नेत्यांनी एकजुटीचा संदेश देत, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजित दादा पवार पॅनेल’ला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

सभेसाठी उपस्थित असलेले शेतकरी,सभासद व कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे