ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलिसांचे संचलन; दंगा काबू योजनेचीही रंगीत तालीम संपन्न

0
5
3
1
8
6
वडगाव निंबाळकर:आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरात रूट मार्च (पथसंचलन) आणि दंगा काबू योजनेची रंगीत तालीम (मॉकड्रिल) आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाद्वारे पोलिसांनी निवडणुका शांततेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रमुख गावांमध्ये रूट मार्च दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते ७:०० या वेळेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य गावांमध्ये रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये कोऱ्हाळे बुद्रुक, वडगाव निंबाळकर, करंजेपूल, निंबूत आणि वाणेवाडी या गावांचा समावेश होता. या संचलनाद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि समाजकंटकांना इशारा देणे, हा मुख्य उद्देश होता.
या रूट मार्चमध्ये १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक, १८ पोलीस अंमलदार आणि ४५ होमगार्ड असा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता.
दंगा काबू योजनेची रंगीत तालीम रूट मार्चपूर्वी, सकाळी ११:०० ते दुपारी १२:१० या वेळेत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या मैदानावर ‘मॉकड्रिल’चे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा दंगलीसारख्या प्रसंगी जमावावर नियंत्रण कसे मिळवावे, याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. या रंगीत तालीमीसाठी पोलीस स्टेशनकडील २ अधिकारी आणि १६ अंमलदार उपस्थित होते.

निवडणुकीच्या काळात कोठेही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे या मोहिमेतून दिसून आले. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





