Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत थरार! बुके देण्याच्या बहाण्याने तरुणावर पिस्तुलातून थेट गोळीबार; सत्तूराने वार करत जीवघेणा हल्ला

0 9 8 5 5 7

बारामती: बारामती शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. हातात फुलांचा गुच्छ (बुके) देण्याच्या बहाण्याने जवळ येऊन एका तरुणावर पिस्तुलातून थेट गोळीबार करत सत्तूरने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पालखी महामार्गावर रविवारी (दि. 18) संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे बारामती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात राणा दिलीप सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (वय 42, व्यवसाय- रियल इस्टेट, रा. जाचकवस्ती, सणसर, ता. इंदापूर) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दोन अज्ञात मास्कधारी हल्लेखोरांवर गुन्हा (गु.र.नं. 521/2026) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, रविवारी सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास फिर्यादी लक्ष्मीकांत सूर्यवंशी आणि राणा दिलीप सूर्यवंशी हे पालखी महामार्गावर विमानतळ रेल्वे ब्रिजच्या पुढे असलेल्या पायलट ढाब्याजवळ उभे होते. त्याचवेळी कटफळच्या बाजूने एका स्कूटी दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण तिथे आले. दुचाकीच्या मागे बसलेल्या तरुणाने अंगात थंडीचे जॅकेट घातले होते आणि ओळख लपवण्यासाठी तोंडाला मास्क लावला होता.

हा मास्क लावलेला तरुण हातात बुके घेऊन राणा सूर्यवंशी यांच्या दिशेने चालत आला. बुके देण्याच्या बहाण्याने तो जवळ आला आणि त्याने अचानक पिस्तुलातून राणा यांच्यावर थेट फायरिंग केली. एवढ्यावरच न थांबता त्याने स्वतःजवळील लोखंडी सत्तूरने राणा यांच्या उजव्या हाताच्या दंडावर सपासप वार केले. या भयंकर आणि अचानक झालेल्या हल्ल्यात राणा यांच्या उजव्या हाताला आणि पोटाच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला सोडून दोन्ही अज्ञात आरोपी स्कूटीवरून घटनास्थळावरून वेगाने पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सोमवारी पहाटे 3 वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांच्याकडे भारतीय न्याय संहिता आणि आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भररस्त्यात गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला असून, बारामती पोलीस या अज्ञात हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. हा जीवघेणा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला? यामागे कुणाचे षड्यंत्र आहे? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे