Breaking
अपघातमहाराष्ट्र

कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक: माळेगाव हद्दीत कारच्या अपघातात अनेक वासरांचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल

0 9 6 5 0 5

बारामती (प्रतिनिधी): कत्तलीच्या उद्देशाने एका होंडा सिटी कारमधून दाटीवाटीने आणि क्रूरपणे गोवंशाची अवैध वाहतूक केली जात असताना, कारचा अपघात होऊन दोन वासरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या अपघातानंतर आरोपींनी जनावरे आणि वाहन तिथेच सोडून पोबारा केला. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी तिघांवर विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तब्बल २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही घटना गुरुवारी, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास कऱ्हावागज (ता. बारामती) गावच्या हद्दीत बारामती-मोरगाव रोडवरील कृषी गार्डन हॉटेलजवळ घडली.
मुबिन अल्ताफ कुरेशी, अल्ताफ शफी कुरेशी आणि आक्रम अल्ताफ कुरेशी (सर्व रा. कुरेशी मोहल्ला, मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आबासाहेब नामदेव लंगुटे (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुबिन कुरेशी याच्या नावावर असलेल्या होंडा सिटी कारमधून (MH 06 W 6108) आरोपी अल्ताफ शफी कुरेशी आणि आक्रम अल्ताफ कुरेशी हे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करत होते. त्यांनी या छोट्या कारमध्ये चक्क १७ जर्सी नर जातीची वासरे आणि १ म्हशीचे रेडकू अशी एकूण १८ लहान जनावरे (वय अंदाजे दोन महिने) दाटीवाटीने आणि निर्दयपणे कोंबली होती.
कार चालक अल्ताफ शफी कुरेशी याने हे वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवल्याने कारचा अपघात झाला. या अपघातात दोन गोवंश जातीच्या जर्सी वासरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर पोलिसांना किंवा कोणालाही माहिती न देता आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन मृत वासरे, १५ जिवंत वासरे आणि २ लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार असा एकूण २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(A), ११(१)(B), महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा (गु.र.नं. २८४/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वीरभद्र मोहोळे हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे