Breaking
अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक

बारामती शहर पोलीस तुमच्या पाठीशी, अन्याय सहन करू नका, निर्भयपणे बोला, महिलांच्या रक्षणासाठी बारामती शहर पोलिसांचे मोठे पाऊल, ‘महिला सेल’ कार्यान्वित.

0 8 8 1 0 8

बारामती : महिला व अल्पवयीन मुलींना सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण मिळावे, तसेच त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांना हक्काचा कायदेशीर आधार मिळावा, यासाठी बारामती शहर पोलिसांनी अत्यंत खंबीर भूमिका घेतली आहे. महिलांना त्यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध निर्भयपणे दाद मागता यावी यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र ‘महिला सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. केवळ गुन्हा नोंदवून न थांबता घरगुती हिंसाचारग्रस्त महिलांना निवासाचा हक्क, कायदेशीर संरक्षण, आर्थिक मदत आणि पुनर्वसनाबाबत एकाच छताखाली मार्गदर्शन देणारी ही यंत्रणा महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

​अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वात हा विशेष महिला सेल सुरू करण्यात आला आहे. या सेलमध्ये महिला पोलीस हवालदार मोनिका मोहिते,ज्योती डिसले,जया खेडकर,प्रिया जगताप व महिला पोलीस शिपाई सीमा साबळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. येथे महिलांच्या तक्रारी शांतपणे व अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या जातील.

​बारामती पोलिसांनी घेतलेली सर्वांगीण भूमिका व पोलिसांनी घेतलेला हा निर्णय केवळ कायदेशीर प्रक्रियेपुरता मर्यादित नसून तो सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. घरगुती हिंसाचार म्हणजे केवळ मारहाण नव्हे, तर वारंवार अपमान करणे, धमकावणे, आर्थिक कोंडी करणे, स्त्रीधनाबाबत त्रास देणे किंवा घरातून काढून देणे हा देखील गुन्हा आहे, हे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

​कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत (DV Act 2005) मिळणाऱ्या अधिकारांबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम हा सेल करणार आहे. यामध्ये महिलेला सामायिक घरात राहण्याचा हक्क, न्यायालयामार्फत संरक्षण आदेश, पर्यायी निवास किंवा घरभाडे, वैद्यकीय खर्च व देखभालीसाठी आर्थिक मदत, मुलांचा तात्पुरता ताबा आणि मानसिक छळाबद्दल नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी योग्य त्या यंत्रणेकडे जाण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘घर सोडून आली म्हणजे महिलेचे सर्व अधिकार संपले असे नाही’, हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक संदेश पोलिसांनी यातून दिला आहे.

महिलांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देण्याच्या याच भूमिकेअंतर्गत पोलिसांनी नुकताच एका विवाहितेच्या छळवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये न आणल्याने मारहाण करणे, चारित्र्यावर संशय घेणे आणि ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेतल्याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांवर हुंडा प्रतिबंधक अधिनियम व नव्या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करत आहेत.

​बारामती पोलिसांचे आवाहन
“महिलांनी भीती, कौटुंबिक दबाव किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या कारणाने अत्याचार अजिबात सहन करू नयेत. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येक पीडित महिलेला सन्मानाने व सुरक्षित वातावरणात आपले म्हणणे मांडता आले पाहिजे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे,” असे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी स्पष्ट केले.
​’भीती नको, मौन नको, अन्यायाविरुद्ध बोला, बारामती शहर पोलीस तुमच्या पाठीशी आहेत’, हा भक्कम संदेश पोलिसांच्या या नव्या उपक्रमातून अधोरेखित झाला असून शहरात या निर्णयाचे स्वागत होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे