गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती पोलिसांची मोठी कारवाई: अट्टल दुचाकी चोरट्यासह अल्पवयीन साथीदार जेरबंद; ४ गुन्हे उघडकीस

0
6
7
6
7
0
बारामती : शहरातील आणि परिसरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. तपास पथकाने शिताफीने सापळा रचून एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली असून, त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईत विविध ठिकाणांहून चोरलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीचा गुन्हा (गु.र.नं. ०१६६/२०२६, BNS कलम ३०३(२)) दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना तपास पथकातील पोलीस हवालदार श्री. यशवंत पवार यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. एक इसम चोरीच्या मोटारसायकली वापरत असून, तो त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवत असल्याची पक्की खबर त्यांना मिळाली होती. या माहितीची तात्काळ पडताळणी करून पोलिसांनी सापळा रचला आणि ऋषिकेश पिंटू मंडले (रा. निरजणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले.

आरोपी ऋषिकेश मंडले याची कसून चौकशी केली असता, या गुन्ह्यांमध्ये एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून चोरीला गेलेली वाहने यशस्वीपणे जप्त केली.
या कारवाईत यामाहा कंपनीची RXG मोटारसायकल, हिरो होंडा स्प्लेंडर, यामाहाची आणखी एक दुचाकी आणि होंडा अॅक्टिवा स्कुटी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बारामती शहर (१), बारामती तालुका (२) आणि सोलापूर ग्रामीण मधील वेळापूर (१) अशा एकूण चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि बारामती शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप भंडारे यांच्या सूचनेनुसार, तपास पथकाचे तपासी अंमलदार पो.हवा. यशवंत पवार, सहा. फौजदार संदीप जाधव, पो.हवा. रामचंद्र शिंदे, आणि पोलीस शिपाई अक्षय सिताफ, अमोल देवकाते, गिरीश नेवसे, पोपट कवितके, विशाल शिंदे व सागर जामदार यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन ही कामगिरी यशस्वी केली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
“नागरिकांनी आपली वाहने पार्क करताना नेहमी योग्य लॉकचा वापर करावा. शक्यतो सुरक्षित आणि CCTV कॅमेरे असलेल्या ठिकाणीच वाहने उभी करावीत. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. थोडीशी सतर्कता बाळगल्यास अशा गुन्ह्यांना सहज आळा घालता येऊ शकतो.” – प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन





