कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ही निवडणूक गटबाजीसाठी,पदासाठी नाही, कुणा एका व्यक्तीचा पराभव करण्यासाठी नाही. ही निवडणूक आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आहे. उपमुख्यमंत्री,श्रीमती सुनेत्रा पवार “जिथे दादा होते तिथे वहिनी असणारच आहे.”
"सोमेश्वर कारखाना कुण्या एकाची वैयक्तिक मालमत्ता नाही, तर हजारो शेतकऱ्यांचा आधारवड!" - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0
9
3
7
0
5
बारामती (करंजे): श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (२०२६-३१) पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करंजे (ता. बारामती) येथील श्री सोमेश्वर मंदिरात शनिवारी (३ ऑक्टोबर) संध्याकाळी ४ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या प्रचारार्थ आयोजित या विराट सभेत राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी सभासदांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजितदादांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेत, दादांच्या पश्चात कारखान्याची आणि शेतकऱ्यांची सर्व जबाबदारी आपण खंबीरपणे पार पाडणार असल्याची ग्वाही दिली.

भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थितांचे आभार मानत, “आज मी तुमच्या समोर केवळ निवडणुकीच्या निमित्ताने उभी नाही, तर सोमेश्वराच्या भविष्याबद्दल बोलण्यासाठी उभी आहे,” असे सांगितले. कारखाना हा केवळ एक साखर कारखाना नसून तो हजारो शेतकऱ्यांच्या संसाराचा आधार आणि अनेक पिढ्यांच्या त्यागाची शिदोरी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अजितदादांच्या आठवणीने भावुक होत त्या म्हणाल्या की, “दादा आपल्यातून जाऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. आमचं कुटुंब तर सुनं झालंच पण इथला बांध न बांध सुना झाला,उसाचं पान न पान सुनं झालं, सगळी शेती सुनी झाली.”
प्रत्येक ठिकाणी त्यांची आठवण आहे, कारण दादांचा सगळ्या परिसरामध्ये व सोमेश्वरवरती आपल्या कुटुंबाप्रमाणे आणि आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जीव होता. त्यामुळे त्यांनी त्या प्रकारचा जीव लावून हा कारखाना सांभाळला.
कारखान्याच्या आजच्या प्रगतीचे श्रेय केवळ एका व्यक्तीचे नसून ते संस्थापक मुकुटराव काकडे, अनेक पिढ्यांचे सभासद, कामगार, संचालक मंडळ आणि दादांच्या मार्गदर्शनाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “काही मंडळी कारखान्याच्या विकासाचं श्रेय स्वतःकडे घेत असली तरी ते सर्व श्रेय कारखान्याच्या फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

आज सोमेश्वरच्या ज्या उंचीवर पोहोचला आहे त्या सर्वांच्या मागे अनेकांचे योगदान आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संस्थापक मुकुटराव काकडे यांची दूरदृष्टी सुरुवातीपासूनच होती, अनेक पिढ्यांच्या सभासदांचा यामागे त्याग आहे, कामगारांचे सर्वांचे आतापर्यंतचे कष्ट आहेत, व्यवस्थापनाचे आजपर्यंतच्या सगळ्या संचालक मंडळाचे निर्णय आहेत आणि अर्थातच आदरणीय अजित दादांनी दिलेली जी दिशा आहे, मार्गदर्शन दिशा त्याचा आहे आणि या सगळ्यांचा सन्मान आपण केला पाहिजे कारण सोमेश्वर पुन्हा एका व्यक्तीने उभारलेला नाही, सोमेश्वर अनेक कष्टकऱ्यांच्या सहकारातून उभा राहिलेला हा कारखाना आहे, आपल्या सर्वांचा आहे, सभासदांचा आहे आणि ही एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. हा कारखाना कुण्या एकाची वैयक्तिक मालमत्ता नाही हा कारखाना हा सभासद मायबापांचा कारखाना आहे. सभासदांच्या उसातून, त्यांच्या घामातून, त्यांच्या पैशातून आणि त्यांच्या विश्वासातून ही संस्था उभी राहिलेली आहे. काही मंडळी कारखान्याच्या विकासाचं श्रेय स्वतःकडे घेत असलं तरी ते सर्व श्रेय कारखान्याच्या फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा आहे असं म्हणणं योग्य आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, १९९२ मध्ये अत्यंत बिकट अवस्थेत असलेला सोमेश्वर कारखाना दादांच्या ताब्यात आला आणि त्यांनी तो कर्जमुक्त करून दाखवला. गेली ३४ वर्षे त्यांनी या कारखान्यासाठी जीवाचे रान केले. कुणी दोन-चार झाडे लावली की स्वतःच्या नावाची पाटी लावतात, पण दादांना स्वतःची पाठ थोपटून घेण्याची कधीच सवय नव्हती, ते केवळ निस्वार्थपणे काम करत राहिले.
दादांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्यात ३६ मेगावॅटचा को-जनरेशन प्रकल्प आणि ९० हजार लिटर क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प यशस्वीपणे उभा राहिला. आज कारखान्याची दररोजची गाळप क्षमता ९ हजार टनांवर पोहोचली असून, शेतकऱ्यांना ४००० रुपयांपर्यंत उच्चांकी बाजारभाव देण्याची क्षमता केवळ दादांच्या दूरदृष्टीमुळे आणि नियोजनामुळे निर्माण झाली आहे.
शेतीला पाणी कमी पडू नये यासाठी दादांनी नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनावर नेहमी लक्ष ठेवले. याशिवाय जनाई शिरसाई योजना आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेची कामे स्वतः लक्ष घालून मार्गी लावली. पुरंदरच्या जिरायत भागात शाश्वत ऊस उत्पादन करून दिल्यामुळेच आज कारखाना १२ ते १५ लाख टन उसाचे गाळप करू शकतो, हे वास्तव त्यांनी यावेळी मांडले.
केवळ साखर कारखानाच नाही तर, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेज उत्तमरित्या सुरू असून, तिथे गोरगरीब शेतकऱ्यांची २३४६ मुले आज शिक्षण घेत आहेत ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
“ज्यांना प्रश्न पडलाय की दादांनंतर आमचे प्रश्न कोण सोडवणार? त्यांना मी सांगू इच्छिते की, दादांची जबाबदारी मी घेतली असून जिथे दादा असायचे, तिथे आता वहिनी असणारच!” असा ठाम विश्वास त्यांनी दिला.



