शिक्रापूर: कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या तयारीत असलेल्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पायी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली असून, या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम ६२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील आठवडा बाजारात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार श्रवण गुपचे, नवनाथ नाईकडे आणि गणेश कुदळे हे पायी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बाजारातील गर्दीत दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना व चोरीचा प्रयत्न करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
जावेद अजिज सय्यद व लुकमान सुलेमान सय्यद (दोघे रा. मदिरा मोहल्ला, शिरूर, जि. पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. अधिक चौकशीत त्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या दोन्ही आरोपींवर यापूर्वी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीसह विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अजित इंगवले करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले व त्यांच्या पथकाने केली.
आठवडा बाजारांवर पोलिसांची करडी नजर
गेल्या महिनाभरापासून शिक्रापूर, तळेगाव आणि कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारांमध्ये पोलिसांचे नियमित पायी पेट्रोलिंग सुरू आहे. यापूर्वी शिक्रापूर बाजारात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांनाही पोलिसांनी पकडले होते. आता कोरेगाव भीमा बाजारात आणखी दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. नागरिकांनीही बाजारात वावरताना काळजी घ्यावी आणि काही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा