वडगाव निंबाळकर : पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पोलिसांकडून विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ९३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण व्हावी हा देखील या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
या धडक कारवाईत मोटार वाहन कायद्याअंतर्गत विविध कारणांसाठी दंड आकारण्यात आला.
यामध्ये रंगीत (ब्लॅक फिल्म) काचा असलेल्या १८ वाहनांवर १९ हजार ५०० रुपये, फॅन्सी, कलर अथवा नंबर प्लेट नसलेल्या १० वाहनांवर ७ हजार रुपये, तर दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ८ जणांकडून ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनापरवाना (ड्रायव्हिंग लायसन्स नसताना) वाहन चालवणाऱ्या ४ जणांवर २० हजार रुपये आणि विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ६ जणांवर ६ हजार रुपयांची कारवाई करण्यात आली.
याव्यतिरिक्त, मालवाहू वाहनांवर आवश्यक रेड रिफ्लेक्टर नसलेल्या १२ केसेसमध्ये १२ हजार रुपये, बुलेट मोटारसायकलमध्ये मॉडिफाईड (फटाका) सायलेन्सर बसवलेल्या ६ केसेसमध्ये ६ हजार रुपये आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० केसेसमध्ये १५ हजार रुपये असा एकूण दंड आकारण्यात आला आहे.
सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा आणि वाहनात नियमबाह्य बदल करू नयेत तसेच वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांना वाहने चालविण्यास दिल्यास आणि अवजड वाहनांनी नियम मोडल्यास यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल आबा जाधव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले, नरेंद्र यादव आणि अरुण सोनवणे यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा