बारामती: दिवाळीच्या सणासुदीत सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना बारामती शहरात मात्र नशेच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश झाला आहे. तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या मेफेन्टरमाईन सल्फेट या इंजेक्शनच्या बेकायदेशीर विक्रीवर बारामती शहर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. या धडक कारवाईत चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ११० नशेची इंजेक्शन्स आणि इतर मुद्देमालासह एकूण २ लाख ३१ हजार ७८४ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, यातील मुख्य आरोपी गौरव जाधव याच्यावर अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होता.
पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत पक्की खबर मिळाली होती की, इंदापूर रोडवरील मार्केट यार्ड शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाच्या मैदानात काही तरुण नशेच्या इंजेक्शनचा साठा घेऊन उभे आहेत. सचिन भेळ अँड वडापाव टपरीच्या आडोशाला हा गोरखधंदा सुरू होता. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी थेट छापा मारला.
पोलिसांनी टाकलेल्या या अचानक छाप्यात चार संशयित तरुण इंजेक्शनच्या बाटल्यांची मोजदाद करताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल ११० मेफेन्टरमाईन इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या. पोलिसांनी गौरव बाळासो जाधव (वय २४), सनी दत्तात्रय गायकवाड (वय २७), विशाल अनिल माने (वय २२) आणि प्रथमेश विश्वनाथ मोहरे (वय २४) या चारही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. या कारवाईत इंजेक्शनच्या बाटल्या, दोन दुचाकी आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख ३१ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे. याआधी मे २०२६ मध्ये पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला याच इंजेक्शनच्या १०० बाटल्यांसह अटक केली होती. अवघ्या सहा महिन्यांतच तो जामिनावर सुटून पुन्हा एकदा या काळ्या धंद्यात सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. एकाच आरोपीकडून सलग दुसऱ्यांदा एवढा मोठा साठा जप्त झाल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे.
सदर औषध हे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता येत नाही. मात्र, आरोपींकडे कोणताही परवाना किंवा प्रिस्क्रिप्शन नव्हते. प्राथमिक चौकशीत प्रथमेश मोहरे याने स्वतःच्या नशेसाठी सनी आणि विशालकडून हे इंजेक्शन विकत घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र, या साखळीचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठून येतो, याचा सखोल तपास आता बारामती पोलीस करत आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या टोळीला गजाआड करून बारामती पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा