Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अनैतिक संबंधांच्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीसह तिघांना अटक 

1 0 0 1 2 9

इंदापूर : तालुक्यातील कळस येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी वेगाने तपास करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपीसह तीन सराईत गुन्हेगारांना पुण्यातून जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कळस (ता. इंदापूर) हद्दीतील नेचर डिलाईट कंपनीच्या कामगार वसाहतीमधील पत्र्याच्या शेडमध्ये घडली. आरोपी मल्लेशी उर्फ मल्लू भोसले उर्फ रमेश शंकर चव्हाण याला जखमी तरुण सूरज यंकाप्पा पवार याच्यासोबत आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपीने सूरजला शिवीगाळ करत कमरेला लपवून आणलेल्या चाकूने त्याच्या पोटात सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वाळचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जखमी सूरजचा भाऊ काशिनाथ यंकाप्पा पवार याच्या फिर्यादीवरून वाळचंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या सूचनेनुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान मुख्य आरोपी मल्लेशी भोसले हा पुण्यामार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपरी-चिंचवड मधील गावडे जलतरण तलाव परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना शिताफीने ताब्यात घेतले.

या कारवाईमध्ये मुख्य आरोपी मल्लेशी उर्फ मल्लू भोसले उर्फ रमेश शंकर चव्हाण (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे), आणि त्याला गुन्ह्यात मदत करणारे अभिषेक उर्फ अक्षय मल्लू भोसले (रा. यवत, ता. दौंड) तसेच रामचंद्र मल्लू भोसले (वय ३० वर्षे, रा. चिंचवड, पुणे) अशा तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाळचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीश चव्हाण तसेच पोलीस हवालदार गणेश झरेकर, कीर्तीलाल गायकवाड, गणेश काटकर, विकास निर्मळ, किसन बेलदार, अमोल गायकवाड, महेश पवार आणि पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश पानकर यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश चव्हाण करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे