Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीत ४ लाखांची लाच घेताना एसटी बँकेचा संचालक रंगेहात जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई

0 7 9 2 9 8

बारामती: प्रलंबित बिले आणि ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी तब्बल ४ लाख रुपयांची लाच घेताना स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एका संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. अनिल तुकाराम बनकर (वय ५१) असे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २८८/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फर्निचर व्यावसायिक आहेत. त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईच्या बारामती शाखेच्या नवीन इमारतीचे फर्निचरचे काम केले होते. या कामाचे एकूण ४८,६०,४५५ रुपयांचे बिल होते, ज्यापैकी ४० लाख रुपये त्यांना मिळाले होते. मात्र, उर्वरित ८ लाख ६० हजार रुपयांचे फर्निचरचे बिल आणि इतर किरकोळ कामांचे ४ लाख ९८ हजार रुपयांचे बिल प्रलंबित होते. ही प्रलंबित बिले आणि ठेव रक्कम बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून मंजूर करून देण्यासाठी आरोपी अनिल बनकर (जे बारामती एमआयडीसी डेपोत वाहतूक नियंत्रक म्हणूनही कार्यरत आहेत) याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती ४ लाख रुपये घेण्याचे आरोपीने मान्य केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर २३ जुलै २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने बारामती एसटी बसस्थानकासमोरील बारामती–इंदापूर मार्गावर सापळा रचला. यावेळी आरोपी बनकर याने स्वतःच्या इर्टिगा कारमध्ये (एमएच ४२ बीई ५७८७) ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत लाचेची रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत. कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असतील, तर नागरिकांनी त्यांना बळी न पडता त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे