अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत थार चालकाची मुजोरी,अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद, पण धनदांडग्यांच्या जहागीरदारीला कायदा चाप लावणार का?
पोलीस उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांच्या तत्पर नेतृत्वात अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या आणि थार गाडी जप्त; पण पुण्याच्या पोर्श प्रकरणानंतरही बोध न घेणाऱ्या धनदांडग्यांच्या मुजोरीला कठोर शिक्षेचा चाप बसणार का, याकडे संपूर्ण बारामतीकरांचे लक्ष!

1
0
3
1
0
7
बारामती : शहरातील सम्यक चौकात कायद्याचे रक्षण करणाऱ्या वाहतूक पोलिसालाच थार गाडीने उडवून बोनेटवरून फरफटत नेल्याच्या थरारक घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या तत्पर नेतृत्वाखाली बारामती शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला जेरबंद करून गाडी जप्त केली असली, तरी या घटनेने अनेक गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत. केवळ अटक करून प्रश्न सुटणार का, की अशा मुजोर धनदांडग्यांची जहागीरदारी उतरवून कायदा त्यांना खरा धाक दाखवणार, असा परखड सवाल आता बारामतीकर विचारत आहेत.
सदर घटना हि २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सम्यक चौकात घडली. बारामती वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय यशवंत भोसले हे इतर कर्मचारी, होमगार्ड आणि सुरक्षा रक्षकांसोबत वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी भिगवण चौकाकडून पेन्सिल चौकाकडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या, काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या महिंद्रा थार गाडीला नियमभंगाबाबत कारवाई करण्यासाठी भोसले यांनी हात दाखवून थांबवले. ते ई-चलन मशीनद्वारे गाडीचा फोटो काढत असतानाच, पोलीस समोर उभे आहेत हे माहीत असूनही चालकाने अचानक गाडीचा वेग वाढवून थार थेट भोसले यांच्या अंगावर घातली. या धडकेत भोसले गाडीच्या बोनेटवर पडले, मात्र चालकाने गाडी न थांबवता त्यांना तसेच फरफटत नेले. काही अंतर गेल्यावर हाताची पकड सुटल्याने भोसले रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डाव्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर चालक गाडीसह पसार झाला. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी करत व ॲपद्वारे MH-53-A-4400 या क्रमांकाच्या थार गाडीचा शोध घेतला असता, ती दत्तात्रय कृष्णा शेडगे यांच्या मालकीची असल्याचे आणि घटनेवेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे गाडी चालवत असल्याचे समोर आले.
भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे अवघ्या चार तासांत आरोपी धीरज शेडगे याला अटक केली आणि थार गाडी जप्त केली.

पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या तत्पर कारवाईनंतरही बारामतीच्या जनतेच्या मनात अनेक संतप्त प्रश्न आहेत.




