सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी २०२६ च्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. कारखान्याचे माजी चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाशी गद्दारी करत थेट पक्षाच्या अधिकृत पॅनेल विरोधात बंडखोरी केल्याने, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे सोमेश्वरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक अधिकृत प्रेस नोट जारी करण्यात आली असून या प्रेस नोट मध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेसाठी पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, पंचायत समिती सभापती किरण तावरे, राजेंद्र कोरेकर आणि नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत या निलंबनाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०२६ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या माध्यमातून २१ उमेदवार लढवत आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांनी स्वतः सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यावेळी माजी चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना विश्वासात घेऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती आणि त्यानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी जगताप यांच्यासह २१ उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले होते. मात्र, उमेदवारी निश्चित होऊनही पुरुषोत्तम जगताप यांनी अत्यंत सुनियोजितपणे सुनेत्रावहिनी पवार यांना गाफील ठेवले. ज्या अजितदादा पवार यांनी सोमेश्वर कारखान्यावर जीवापाड प्रेम करून हा कारखाना महाराष्ट्रात अव्वल केला, त्यांच्याच विचारांना जगताप यांनी तिलांजली देत, जुजबी कारणे पुढे करत पक्षाच्या अधिकृत पॅनेल विरोधात स्वतःसह स्वतंत्र पॅनेल उभे करून मोठी बंडखोरी केली.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी आणि पक्षाशी केलेली ही गद्दारी व विश्वासघात आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अजितदादांवर सच्चे प्रेम करणाऱ्या सभासदांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पुरुषोत्तम जगताप हे पक्षाच्या व विकासपुरुष अजितदादांच्या विचारांशी प्रतारणा करून पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने अखेर त्यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली असून,
या बंडखोरीचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा