अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत दृश्यमान पोलिसिंग (Visible Policing) वाढवण्याचे निर्देश, अचानक नाकाबंदी मोहीम. बारामती शहर पोलीस आणि वाहतूक शाखेची संयुक्तपणे ९२ वाहनांवर कारवाई, ६६ हजारांचा दंड वसूल.

0
8
8
2
8
1
बारामती, दि. ०८: बारामती शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बारामती शहर पोलीस आणि वाहतूक शाखेने संयुक्तपणे फलटण चौक परिसरात अचानक नाकाबंदी मोहीम राबवली. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत तब्बल ९२ वाहनांवर केसेस करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. ०८ सप्टेंबर) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत फलटण चौक येथे ही विशेष नाकाबंदी करण्यात आली. पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि नागरिकांना सुरक्षित वाटले पाहिजे, या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी अचानक नाकाबंदी आणि दृश्यमान पोलिसिंग (Visible Policing) वाढवण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, १० पोलीस अंमलदार, १ आर.सी.पी. पथक आणि शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी सहभागी झाले होते.

या तीन तासांच्या मोहिमेत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. यामध्ये तुटलेली नंबर प्लेट असलेल्या सर्वाधिक ३२ वाहनांवर कारवाई करत २३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच नो-पार्किंगच्या २६ केसेस (१४ हजार रुपये दंड), लायसन्स जवळ न बाळगल्याप्रकरणी १२ केसेस (१० हजार रुपये), ट्रीपल सीट ३ केसेस (३ हजार रुपये), आणि काळी काच असलेल्या ३ वाहनांवर (३ हजार ५०० रुपये) दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहनात अनधिकृत बदल करणे (३ केसेस), पोलीस इशारा (५ केसेस) आणि इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना त्रास देणाऱ्या कर्कश आवाजाच्या बुलेट सायलन्सरवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. या कारवाईत अशा ७ बुलेट मोटारसायकलींवर दंडात्मक नोंद करण्यात आली असून, यापुढेही अशा वाहनांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शहर पोलीस आणि वाहतूक शाखा यांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून ही धडक कारवाई केली. केवळ दंड वसूल करणे हा या मोहिमेचा उद्देश नसून, अपघात रोखणे आणि रस्त्यावरील शिस्त वाढवून नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा मुख्य हेतू आहे. वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाच्या सुरक्षेसाठी आहेत, हा संदेश यातून देण्यात आला.
वाहनचालकांना पोलिसांचे आवाहन
वाहनचालकांनी आपली कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहनांची नंबर प्लेट नियमानुसार असावी, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा आणि कोणत्याही प्रकारे वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या अचानक आणि संयुक्त मोहिमा यापुढेही शहरात सातत्याने राबवल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



