पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा राखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे आदेश निर्गमित केले आहेत. दि. १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोली वाहतूक विभागांतर्गत अहमदनगर रस्त्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
पोलीस उप-आयुक्त (वाहतूक शाखा) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत.
वाहतुकीतील प्रमुख बदल आणि निर्बंध
* क्षेत्र: पुणे-अहमदनगर रोडवरील लोणीकंद ते खराडी बायपास दरम्यानचा मार्ग आणि या मुख्य मार्गाला जोडणारे इतर अंतर्गत रस्ते.
* कालावधी: दि. १८/०३/२०२६ ते दि. २२/०३/२०२६ पर्यंत (०४ दिवस).
* वेळ: दररोज सकाळी ‘पीक अवर्स’ (गर्दीची वेळ) तसेच दुपारी ०२:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत.
* प्रतिबंधित वाहने: सर्व प्रकारची लक्झरी वाहने, मालवाहू ट्रक, जड व अवजड वाहने, डंपर, आर.एम.सी. मिक्सर, बल्कर, जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर आणि इतर तत्सम वाहने.
या आदेशातून अत्यावश्यक सेवेतील वाहने जसे की
१. फायरब्रिगेड (अग्निशमन दल)
२. पोलीस वाहने
३. रुग्णवाहिका
४. पी.एम.पी.एम.एल. (PMPML) आणि एस.टी. (ST) बसेस
यांना या बंदीतून वगळण्यात आले असून त्यांची वाहतूक नियमित सुरू राहील.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी येणाऱ्या कुस्ती प्रेमींची आणि खेळाडूंची गर्दी लक्षात घेता, प्रवाशांनी आणि वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा