
पुणे: पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेचा तिसरा टप्पा (स्टेज ३) २२ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, यादरम्यान सासवड, जेजुरी, सुपा, आणि बारामती परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत.

स्पर्धेचा मार्ग आणि वेळ
दिनांक: २२ जानेवारी २०२६.
वेळ: सकाळी ०८:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत.
मार्ग: सासवड, जेजुरी, वडगाव निंबाळकर, सुपा, माळेगाव, बारामती तालुका आणि बारामती शहर (एकूण १३७ कि.मी. अंतर).
जड वाहनांना बंदी
सासवड नगरपरिषद परिसर: दिनांक २१ जानेवारीच्या रात्री १०:०० वाजल्यापासून ते २२ जानेवारीच्या रात्री ८:०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
बारामती (विद्या प्रतिष्ठान परिसर)
दिनांक २१ जानेवारीच्या रात्री १०:०० वाजल्यापासून ते २२ जानेवारीच्या रात्री ८:०० वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
वाहतूक बदलांचे स्वरूप (स्टेज ३ साठी)
१. सासवड पोलीस स्टेशन हद्द
हडपसर-सासवड-जेजुरी रोडवरील सासवडकडे जाणारी वाहतूक चंदनटेकडी येथून पूर्णपणे बंद करून बायपासने ‘बोरावके मळा’ या बाह्यवळण मार्गाने वळविण्यात येईल.
सासवड-कापूरहोळ मार्गावरील वाहतूक पानवडी गाव पास होईपर्यंत बंद राहील. ही वाहतूक चंदनटेकडी बायपास-बोरावके मळा-वीर फाटा-परिंचे मार्गे कापूरहोळ अशी वळविण्यात आली आहे.
सासवड-कोंढवा आणि सासवड-वीर मार्गावरील वाहतूक देखील बोरावके मळा बायपास मार्गे वळविण्यात आली आहे.
खेड शिवापूर मार्गे मरिआई घाटातून सासवडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
२. जेजुरी पोलीस स्टेशन हद्द
सायकल स्पर्धेदरम्यान सातारा मार्गे नगर/केडगाव चौफुलाकडे जाणारी वाहतूक लोणंद-फलटण-बारामती-भिगवण मार्गे वळविण्यात आली आहे.
सासवड मार्गे बारामती व सातारा जाणारी वाहतूक बेलसर फाटा-नाझरे क.प.-सुपा-बारामती-फलटण मार्गे वळविण्यात येईल.
फलटण-लोणंद येथून जेजुरी मार्गे पुण्यात जाणारी वाहतूक फलटण-लोणंद-शिरवळ मार्गे पुण्याकडे जाईल.
३. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्द
बारामती-निरा ते सातारा जाणारी वाहतूक बारामतीहून फलटण मार्गे वळविण्यात आली आहे.
स्पर्धा संपेपर्यंत निरा कॉर्नर, बारामती कॉर्नर, चौधरवाडी फाटा, वाकी फाटा आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुळूचे गावातील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
४. सुपा पोलीस स्टेशन हद्द
शिरूर-सातारा हायवेवरील वाहतूक केडगाव चौफुला-पाटस-सुपा-बारामती-फलटण-सातारा अशी वळविण्यात आली आहे.
सासवड-मोरगाव-बारामती मार्गावरील वाहतूक सासवड-कुंभारवळण-पारगाव-सुपा-बारामती अशी वळविण्यात आली आहे.
५. बारामती तालुका व शहर
इंदापूर रोडने बारामतीकडे येणारी वाहतूक काटेवाडी ब्रीज येथे बंद करून काटेवाडी गावातून कन्हेरी गाव मार्गे जळोची ब्रीजवरून वळविण्यात आली आहे.
पालखी महामार्गावरून होणारी सर्व वाहतूक स्पर्धा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत पूर्णपणे बंद राहील.
भिगवण-बारामती रोडवरील वाहतूक पेन्सिल चौकातून आरटीओ ऑफिस चौक मार्गे वळविण्यात आली आहे.
पाटस बाजूकडून बारामती एमआयडीसीकडे येणारी जड वाहतूक पाटस येथेच (यवत पोलीस स्टेशन हद्द) बंद करण्यात येईल.
नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा