कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
१० जूनपर्यंत मान्सूनची शक्यता नाही; १ जूनपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी

0
7
0
3
3
9
मुंबई, दि. ३१ मे: राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होताना दिसत असून, उद्यापासून म्हणजेच १ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्यात या बदलांचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवणार आहे. राज्याच्या अनेक भागांत वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सूनपूर्व वळीव स्वरूपाचा पाऊस आहे. सद्यस्थितीत मान्सून अद्याप केरळमध्येच दाखल न झाल्यामुळे राज्यात किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये, असे महत्त्वपूर्ण आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
मे महिन्याच्या तीव्र उकाड्यानंतर आता राज्यातील कमाल तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळेल. मात्र, विदर्भातील काही भागांमध्ये, विशेषतः पूर्व विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणि चटके कायम राहतील. या भागात कमाल तापमान अजूनही ४० अंश सेल्सिअसच्या वर राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढग जमा होऊन वादळी पावसाची शक्यता आहे. यासोबतच जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. तसेच, कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, आगामी काळात पडणाऱ्या या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

सध्या पडणारा पाऊस हा केवळ मान्सूनपूर्व पाऊस असल्याने, या पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल निर्माण होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे या वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केल्यास, पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवू शकते. जोपर्यंत मान्सूनचे अधिकृतरित्या आगमन होऊन जमिनीत योग्य प्रमाणात ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू करू नयेत, असा सल्ला देण्यात आला आहे.




