बारामती: बारामती तालुका पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेली बुलेट गाडी जप्त करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दीपक गुलाब बंडगर (राहणार सूर्यनगरी, बारामती) यांनी १७ जून २०२६ रोजी त्यांची बुलेट (क्रमांक एमएच ४२ एयु ४३४४) सूर्यनगरी येथील लेन नंबर दोनमध्ये पार्किंगमध्ये उभी केली होती. पहाटे साडेपाच ते सकाळी सव्वाआठ या वेळेत अज्ञाताने ही बुलेट चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली. गुन्हे शोध शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. समीर विलास लोंढे याने त्याच्या साथीदारासह ही बुलेट चोरली असून ते भिगवण रोडवरील वनविभागाच्या मोकळ्या जागेत बसले असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिथे बसलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या शेजारीच चोरीला गेलेली बुलेट गाडी उभी होती. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे समीर विलास लोंढे (वय २० वर्षे, राहणार मलठण, तालुका दौंड) आणि मयूर विकास बनकर (वय २० वर्षे, राहणार विठ्ठल मंदिराशेजारी, श्रीरामनगर, बारामती) अशी सांगितली. त्यांच्याकडे बुलेटबाबत विचारपूस केली असता त्यांनी गाडी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना १७ जून २०२६ रोजी अटक केली आणि चोरीला गेलेली बुलेट जप्त केली.
ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार रामदास जाधव, एकसिंगे, ढवान, महिला पोलीस हवालदार रचना काळे, भारती खंडागळे आणि पोलीस शिपाई निलेश वाकळे यांनी सहभाग घेतला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा