बारामती: कन्हेरी येथील रूई सावळ पुलाजवळ महामार्गावर हायवा ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात हायवा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन अनिल विटकर (वय २६, रा. लिमटेक, ता. बारामती, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र इंद्रजित विठ्ठल खंडाळे (रा. लिमटेक, ता. बारामती) हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन विटकर आणि इंद्रजित खंडाळे हे दोघे त्यांच्या मोटारसायकलवरून (क्रमांक MH 42 AL 9740) जात असताना कन्हेरी गावच्या हद्दीतील रूई सावळ पुलाजवळ आले असता, समोरून जाणाऱ्या हायवा ट्रकच्या (क्रमांक MH 45-1247) अज्ञात चालकाने अचानक लेन कट केली. त्यामुळे दुचाकी हायवा वाहनावर पाठीमागून धडकली.
या भीषण धडकेत अर्जुन विटकर याचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला, तर इंद्रजित खंडाळे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संबंधित हायवा चालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला.
या प्रकरणी मयत अर्जुनचा चुलत भाऊ अमन सुनिल विटकर (वय २८, रा. लिमटेक) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात हायवा चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार देवकाते करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा