Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई: आठ लाखांचा चोरीचा हायवा टिपर हस्तगत, दोन आरोपी जेरबंद

0 7 9 6 1 1


बारामती: तालुक्यातील मुढाळे येथील पेट्रोल पंपावरून चोरीला गेलेला ८ लाख रुपये किमतीचा हायवा टिपर शोधण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेले वाहन व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी नवनाथ शंकर जगताप (वय ५२, रा. मुरुम, ता. बारामती) यांचा टाटा कंपनीचा १० चाकी एलपीके २५१८ मॉडेलचा हायवा टिपर (क्र. एम.एच ४२/ए.एफ ६३९६) हा दिनांक २२ जुलै २०२६ रोजी रात्री ८ ते २३ जुलैच्या सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान मुढाळे येथील माळशिखारे यांच्या हिंदुस्थान पेट्रोलियम पंपावरून चोरीला गेला होता. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तात्काळ गुन्हे शोध पथक तपासासाठी रवाना केले. तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने वाळूज एमआयडीसी, संभाजीनगर येथून चोरीला गेलेला टिपर आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले.

राहुल विठ्ठल कराळे (वय ३१) आणि आदित्य रमेश कराळे (वय २५, दोघेही रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस हवालदार भागवत पाटील, महेश पन्हाळे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, पोलीस शिपाई आबा जाधव, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले आणि विकास येटाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास तपासी अंमलदार पोलीस हवालदार भागवत पाटील हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे