गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: सराईत आंतरजिल्हा दरोडेखोर टोळी जेरबंद, २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
7
3
1
2
8
पुणे: दौंड, बारामती आणि जुन्नर उपविभागात गेल्या काही महिन्यांपासून एकाच प्रकारच्या गुन्हे पद्धतीचा अवलंब करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीने एकाच रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकले होते. पोलिसांनी या टोळीतील प्रमुख आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सुमारे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण २५ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोरवडी गावच्या परिसरातील बाबीरनगर, आवदेवस्ती, आवाळेवस्ती आणि खोरवडी अशा चार ठिकाणी तसेच शेजारील श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी अनोळखी ६ ते ७ दरोडेखोरांनी नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करत हत्याराने मारहाण केली होती. या दरोड्यात त्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि मोटार सायकल असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच रात्री घडलेल्या या गंभीर घटनांची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागातील तपास पथकांची बैठक घेऊन ६ पथके तयार केली आणि गुन्हा उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन केले.

तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून हे आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातून आले असून गुन्हा करून पुन्हा तिकडेच गेल्याची खात्री झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने १३ जून २०२६ रोजी रात्रभर कर्जत (जि. अहिल्यानगर) आणि आष्टी (जि. बीड) परिसरात एकाच वेळी छापे टाकून गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत), विशाल हंबरड्या काळे (वय २१, रा. चिखली, ता. आष्टी) आणि किशोर रावण भोसले (वय १९, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत) यांना ताब्यात घेतले, तर एका विधीसंघर्षित बालकाला रखवालीत घेतले. या टोळीतील आणखी एक मुख्य आरोपी प्रवीण उर्फ पप्पू लाला भोसले आणि त्याचे इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पुणे ग्रामीणमधील १२ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ असे एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.




