बारामती (दि. १० जून २०२६):
सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा आणि तंबाखू माफियांवर बारामतीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ५५,२४४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून, यामागील आंतरराज्यीय साखळी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी जळोची (बारामती) परिसरातील भिगवण रोडवर असलेल्या ‘विश्व एम्पायर’ मधील ‘मे. धानेश्वरी किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स’ या दुकानावर छापा टाकण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे, लक्ष्मीकांत सावळे आणि पंचांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
या धडक कारवाईत विविध नामांकित ब्रँड्सचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने खालील उत्पादनांचा समावेश आहे: प्रीमियम आर.एम.डी. पानमसाला, एम सेंटेड तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, गुलाम गुटखा, बाजीगर गुटखा आणि के.आर.१००० गुटखा. एकूण रु. ५५,२४४/- किमतीचा हा माल जप्त करून पुढील विक्रीस आळा घालण्यात आला आहे.
याप्रकरणी दुकानाचे मालक आणि विक्रेते गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी (वय ३८ वर्षे, रा. बारामती) यांना १० जून रोजी अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपीने हा माल कर्नाटकातून आणल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्याबाबतचे कोणतेही खरेदी बिल अथवा वैध कागदपत्रे त्याला सादर करता आली नाहीत.
अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात (गु.र.नं. २३३/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरवठा साखळीवर पोलिसांची नजर:
हा तपास केवळ एका किरकोळ विक्रेत्यापुरता मर्यादित न ठेवता, गुटखा तस्करीची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचा पोलिसांचा मानस आहे. आरोपीकडे असलेल्या माहितीच्या आधारे मुख्य पुरवठादार, वाहतूकदार, वितरक आणि उत्पादक यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक व्यवहार व ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
हि कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा