गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
ब्रेकिंग न्यूज: बारामतीत भोंदू मौलानाचा पर्दाफाश; काळी विद्या आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलेची आर्थिक लूट व विनयभंगाचा प्रयत्न
आरोपी मौलाना अब्दुल हलीम शेखवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; अटकेच्या भीतीने काश्मीरला पलायन.

0
6
9
6
6
6
बारामती : बारामती शहर आणि परिसरात अंधश्रद्धा, खोटे तांत्रिक उपाय आणि काळी विद्या दूर करण्याच्या नावाखाली महिलांची मोठी आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू मौलानाचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मौलाना अब्दुल हलीम शेख आणि त्याच्या साथीदारांवर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, खंडणी आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा (जादूटोणाविरोधी कायदा) अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अब्दुल हलीम शेख हा स्वतःला मोठा धार्मिक गुरू आणि तांत्रिक उपाय करणारा मौलाना भासवत असे. लोकांच्या कौटुंबिक, आर्थिक व व्यावसायिक अडचणी चुटकीसरशी दूर करण्याचे खोटे दावे करून तो नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. यासाठी तो स्वतःचा दरबार भरवत असे आणि धार्मिक उपायांच्या नावाखाली लोकांमध्ये भीती निर्माण करून त्यांच्याकडून प्रचंड आर्थिक लाभ लाटत होता.
आरोपी आणि त्याच्या हस्तकांनी पीडित महिलेकडून वेळोवेळी रोख रक्कम, धनादेश आणि ऑनलाईन (PhonePe/UPI) माध्यमातून मोठी रक्कम उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहारांचे सर्व डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पैशांची भूख न शमलेल्या या भोंदू मौलानाने तांत्रिक विधी करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेला मध्यरात्री बोलावून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंगाचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला असता, तुझ्यावर काळी विद्या करेन, तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन अशा भयंकर धमक्या देत तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८(४), ३५१(२), ७४, ७५, ३(५) तसेच जादूटोणाविरोधी अधिनियम २०१३ चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होणार याची कुणकुण लागताच आरोपी अब्दुल हलीम शेख याने बारामतीतून थेट काश्मीरला पलायन केले आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव करत आहेत. पोलिसांकडून आरोपीचे मोबाईल लोकेशन आणि बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन:
या भोंदू मौलानाने बारामती आणि परिसरातील आणखी किती महिलांची व नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी आवाहन केले आहे की, कोणत्याही नागरिकाची किंवा महिलेची अशा प्रकारे तांत्रिक उपाय, संकट निवारण किंवा काळी विद्या करण्याच्या नावाखाली फसवणूक झाली असल्यास त्यांनी निर्भयपणे बारामती शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. तसेच, सोशल मीडियावरील भोंदूगिरी आणि खोट्या आश्वासनांना बळी न पडण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



