Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई: सूर्यनगरीतील घरफोडीचा छडा; चोरट्यासह सोनार गजाआड

0 5 5 5 3 3

बारामती: शहरातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या सूर्यनगरी भागात धुमाकूळ घालणाऱ्या घरफोड्यांचा छडा लावण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या जोरावर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून, चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनारालाही बेड्या ठोकल्या आहेत.

सूर्यनगरी परिसरात चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत बिरादार यांच्या घरातून ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास चोरट्याने हातसाफ केला होता. त्यांची पत्नी मुलाला खेळवण्यासाठी घराखाली गेल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व १० हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

तसेच, याच परिसरातील सुरेंद्र चव्हाण यांच्या मेस व्यवसायातील ३५ हजार रुपयांची रोकडही चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांमुळे सूर्यनगरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ऋषिकेश विजय कोकाटे (वय २१, रा. इंदापूर) याला तांदुळवाडी येथून ताब्यात घेतले.

* आरोपी ऋषिकेशने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

* त्याने चोरलेले दागिने इंदापूर येथील सोनार श्रेयस विठ्ठल कुलथे याला विकल्याचे सांगितले.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सोनारालाही अटक केली आहे.

ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार केदारनाथ बिडवे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राहुल मखरे, सुरेश लांडगे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा समावेश होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे