बारामती : तालुक्यातील पळशी येथे रविवारी (दि. २५) सकाळपासून एक महिला रस्त्यावर फिरत असताना आढळून आली. तिच्या अनियंत्रित वर्तनामुळे गावातील लहान मुले, महिला आणि नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पळशीतील ग्रामस्थांनी तातडीने तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
ग्रामस्थांनी तत्काळ १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई सुरज पवार आणि अंजली लोखंडे हे पोलीस वाहनासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चौकशीदरम्यान ही संबंधित महिला जेजुरी येथील असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी या महिलेला रुग्णवाहिकेत किंवा पोलीस वाहनात बसण्याची विनंती केली, मात्र ती वारंवार समजावून सांगूनही वाहनात बसण्यास तयार नव्हती. तिला शांत करून सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी सामाजिक कार्याची जाण असलेल्या मनोबल आसरा फाउंडेशनचे किशोरकुमार खलाटे यांना मदतीसाठी बोलावले.
किशोरकुमार खलाटे यांनी घटनास्थळी पोहोचताच महिलेशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला आणि तिला वडापाव तसेच पाणी दिले. यामुळे ती महिला शांत झाली आणि स्वतःहून वाहनात बसण्यास तयार झाली. यानंतर तिला जेजुरी येथील तिच्या घरी नेऊन तिच्या मुलाच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.
पोलीस, ग्रामस्थ आणि फाउंडेशनच्या या संयुक्त व तत्पर प्रयत्नांमुळे एका महिलेची सुखरूप घरवापसी झाली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा