ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास उच्च न्यायालयाची बंदी, डीजे आणि लेझर लाईटवरही कडक निर्बंध, प्रदूषणमुक्त सण साजरे करा. बारामती शहर पोलिसांचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन.

0
9
8
3
5
6
बारामती : सार्वजनिक रस्ते, गल्लीबोळ आणि पदपथांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली असून, या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे जाहीर आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे. तसेच डीजे, ध्वनिक्षेपक, लेझर लाईट आणि ध्वनी-वायुप्रदूषणासंबंधी निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनी व पर्यावरण प्रदूषणासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. हा न्यायालयीन आदेश केवळ एका उत्सवापुरता मर्यादित नसून दिवाळी, दसरा, नवरात्रोत्सव तसेच वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांना संपूर्ण राज्यात समानपणे लागू राहील. नागरिकांचे आरोग्य, सार्वजनिक सुरक्षितता आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या महत्त्वाच्या नियमावली आणि सूचना खालीलप्रमाणे:
१. सार्वजनिक रस्त्यांवर फटाकेबंदी: मुख्य चौक, रस्ते, वाहतुकीचे मार्ग, गल्लीबोळ आणि पदपथांवर सकाळी अथवा रात्री कोणत्याही वेळेत फटाके फोडण्यास संपूर्ण बंदी आहे. यामुळे होणारे अपघात आणि पादचाऱ्यांचा त्रास टाळता येईल.
२. वेळेचे बंधन: ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांनुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे.
३. शांतता क्षेत्रात विशेष काळजी: रुग्णालये, शाळा, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरात फटाके फोडण्यावर व वाद्यांवर विशेष निर्बंध असतील. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी.
४. डीजे आणि लेझर लाईटवर नियंत्रण: डीजे, साऊंड सिस्टीम आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. तसेच मिरवणुकीत डोळ्यांना हानिकारक असणारे लेझर लाईट, अति-तीव्र प्रकाशझोत आणि बीम लाईट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
५. विक्रेते व मंडळांना सूचना: फटाके विक्रेत्यांनी वैध परवान्यासह नियमांचे पालन करावे आणि केवळ कायदेशीर फटाक्यांची विक्री करावी. तर सार्वजनिक उत्सव मंडळांनी नियमांचे पालन करूनच मिरवणुका काढाव्यात.
कायदा मोडल्यास कठोर कारवाई व जप्ती
या न्यायालयीन आदेशांचे आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, आयोजक व संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच वेळ पडल्यास संबंधित वाद्ये, यंत्रसामग्री व साहित्याची जप्तीही होऊ शकते, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.



