Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त करंजेपुलमध्ये १०२ बाटल्या रक्तदान; रक्तदान आणि ‘अजितवृक्ष’ लागवडीतून सोमेश्वरनगर-करंजेपुल परिसरात अजित पवार यांना विनम्र अभिवादन

0 7 9 1 4 8


सोमेश्वरनगर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती तालुक्यातील करंजेपुल आणि सोमेश्वरनगर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यामध्ये १०२ बाटल्या रक्तदान आणि सोमेश्वर फॉरेस्ट ग्रुपतर्फे ‘अजितवृक्ष’ लागवड यांसारख्या स्तुत्य उपक्रमांचा समावेश होता.
करंजेपुल येथे बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघ, सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी व बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०२ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना जगताप यांनी अजित पवार यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा रथ पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना खंबीर साथ देण्याचे मत व्यक्त केले. या शिबिरास पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, माजी संचालक रमाकांत गायकवाड, लक्ष्मण गोफणे, संचालक ऋषिकेश गायकवाड, करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, तक्रार निवारण कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश आळंदीकर, निलेश गायकवाड, सागर गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रेड क्रॉस ब्लड बँक पुणे यांच्या वतीने अर्चना पाफळ यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू दिल्या. तसेच क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी ज्येष्ठांना ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे आत्मचरित्र भेट दिले व अजित पवारांच्या क्रीडा धोरणांची माहिती उपस्थितांना दिली.

दुसरीकडे, करंजेपुल व सोमेश्वरनगर येथील तरुणांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सोमेश्वर फॉरेस्ट ग्रुपनेही अजित पवार यांना एका अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. अजित पवार हे वृक्षप्रेमी होते, याची आठवण जपत या तरुणांनी करंजीपूर वनक्षेत्रामध्ये सकाळी ठीक सात वाजता सात फूट उंचीची सात सोनचाफ्याची झाडे लावली.

या झाडांना त्यांनी ‘अजितवृक्ष’ असे नाव दिले असून या वृक्षांच्या कायमस्वरूपी संगोपनाची हमी देखील घेतली आहे. प्रवेश मुलानी, सागर गायकवाड, संदीप साखरे, ॲड. गणेश आळंदीकर, निलेश गायकवाड, उदय किर्वे, संदीप साळुंखे, दत्तात्रय जाधव, जालिंदर गायकवाड, सचिन खैरे, चेतन बोबडे, हरीश गायकवाड, सूरज जाधव, सुरज ऊर्फ सोजल गायकवाड, राजेंद्र पवार, राहुल गायकवाड या युवकांनी हा वृक्ष लागवडीचा उपक्रम पार पाडला.

नियमितपणे वनक्षेत्रातील झाडांची देखभाल करणाऱ्या व किल्ले मोहिमांवर स्वच्छतेचे धडे गिरवणाऱ्या या युवकांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड, वाघळवाडीचे सरपंच ॲड. हेमंत गायकवाड, लक्ष्मण गोफणे, योगेश सोळसकर, प्राजक्ता सोळसकर, दिव्यतेज शेंडकर या मान्यवरांनी उपस्थित राहून स्वतःही श्रमदान केले. विशेष म्हणजे, या विधायक कामासाठी एकत्र आलेल्या सोमेश्वर फॉरेस्ट ग्रुपच्या सदस्यांनी आजी-माजी सैनिक संघाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातही आपला मोठा सहभाग नोंदवला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे