गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
‘रील’साठी ‘रिअल’ लाईफ धोक्यात! सोशल मीडियावरील भाईगिरीला पोलिसांचा चाप, सुपा पोलिसांची शस्त्रास्त्र कायद्यान्वये धडक कारवाई

0
8
5
9
4
5
बारामती /सुपा (दि. २५ ऑगस्ट २०२६): सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी स्वतःचा दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या प्रवृत्तींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कायदेशीर बडगा उगारला आहे. हातात पिस्तूल सदृश्य शस्त्र घेऊन इन्स्टाग्रामवर रील बनवणाऱ्या बारामती तालुक्यातील एका तरुणावर सुपा पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सुपा पोलीस ठाण्याचे सायबर मॉनिटरिंग पथक सोशल मीडियावरील घडामोडींवर लक्ष ठेवून असताना, सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) prem_jagtap_0295 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी (ता. बारामती) येथील रहिवासी असलेला तरुण प्रेम प्रताप जगताप याने हातात पिस्तूल सदृश्य वस्तू घेऊन व्हिडिओ पोस्ट केला होता. सदर व्हिडिओवर आलीशान युवा प्रतिष्ठान असा मजकूर टाकून,

शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है अशी प्रक्षोभक व धमकीवजा वाक्ये वापरण्यात आली होती. यासोबतच ऑडिओमध्ये एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा संदर्भ देऊन, समाजात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक दहशत व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. सध्या पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी, सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत आरोपी प्रेम जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये अत्यंत कडक गुन्हा दाखल केला आहे.




