सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-३१ या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सायंबाची वाडी येथे गावभेट दौरा पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. नानासाहेब देवकाते पाटील आणि गट क्रमांक ३ मधील उमेदवार श्री. रवींद्र भापकर यांनी परिसरातील सभासदांच्या भेटी घेत त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व ‘कपबशी’ला मतदान करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उमेदवार रवींद्र भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना पाटील (देवकाते), जिल्हा बँकेचे माजी संचालक मदन नाना, भवानीनगर कारखान्याचे संचालक बाळासाहेब, दूध संघाचे चेअरमन फडतरे साहेब, दूध संघाचे माजी चेअरमन संदीप पाटील, सोमेश्वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन किसन नाना, तसेच पंचायत समितीचे गटनेते व सदस्य रावसाहेब चोरमले आणि मुरलीधर ठोंबरे हे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

सभासदांना मार्गदर्शन करताना नानासाहेब देवकाते पाटील यांनी कारखान्याच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय आदरणीय अजित दादांना दिले. ते म्हणाले की, “शासन दरबारातून सर्वतोपरी मदत मिळवून देऊन दादांनी कारखान्याला कर्जमुक्त केले आहे. इन्कम टॅक्स कमी झाल्याने कारखान्याला मोठा फायदा होऊन आज कारखाना अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “अजित दादा स्वतः रात्री १०-१० गावांमध्ये विधानसभेच्या धर्तीवर सभा घेत आहेत. विरोधकांना धडा शिकवण्यासाठी आणि बारामतीचा व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी सुनेत्रा वहिनी आणि पार्थ दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. केंद्रात आणि राज्यातही दाखवून द्यायचे आहे की हा गड आजही भक्कम आहे.”
ही निवडणूक ‘मिनी आमदारकी’, निधीसाठी पॅनल निवडून द्या – रवींद्र भापकर: गट क्रमांक ३ चे उमेदवार रवींद्र भापकर यांनी गावकऱ्यांशी कौटुंबिक जवळीक साधत सायंबाची वाडी, लोणी भापकर, मासावाडी, पळशी आणि माळवाडी लोणी या सर्व गावांना ‘आपले कुटुंब’ असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “सोमेश्वर कारखान्याची ही निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थाने ‘मिनी आमदारकी’ आहे. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर आपले हात बळकट करण्यासाठी आणि बारामतीमध्ये विकासाचा, निधीचा ओघ अखंड सुरू ठेवण्यासाठी आपल्या विचारांचे पॅनल निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे.”
येत्या ११ तारखेला होणाऱ्या मतदानात कोणताही संभ्रम न ठेवता, मतदान केंद्रावर जाताना केवळ अजित दादा आणि सुनेत्रा वहिनींचे स्मरण करावे, असे भावनिक आवाहन नेत्यांनी केले. सर्व २१ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी ‘कपबशी’ या चिन्हासमोरील शिक्का मारून ‘पॅनल टू पॅनल’ मतदान करावे आणि कारखान्याचे उज्ज्वल भविष्य निश्चित करावे, अशी साद दोन्ही नेत्यांनी उपस्थित सभासदांना घातली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा