वाढदिवस म्हटला की मोठा खर्च आणि झगमगाट हे समीकरण आजकाल सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, याला फाटा देत एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस समाजातील वंचित विद्यार्थ्यांसोबत साजरा करून एक नवा व सकारात्मक आदर्श प्रस्थापित केला आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या करंजेपूल दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला.

बारामती तालुक्यातील मुर्टी-मोढवे येथील ‘यशवंतराव मोरे-पाटील आश्रमशाळेत’ हा आगळावेगळा आणि भावस्पर्शी वाढदिवस पार पडला. या विशेष प्रसंगी साबळे यांनी आश्रमशाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली. यासोबतच विद्यार्थ्यांना वही, पेन आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो निखळ आनंद उमटला, तोच या वाढदिवसाचा खरा आनंदोत्सव ठरला.
खाकी वर्दीतील अधिकाऱ्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच आपले संवेदनशील मनही यातून दाखवून दिले आहे. “आपल्या आनंदाच्या क्षणांमध्ये समाजातील गरजू घटकांनाही सामावून घेतले पाहिजे, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,” हा अत्यंत मोलाचा संदेश राहुल साबळे यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
या प्रेरणादायी उपक्रमाला इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी केवळ उपस्थितीच लावली नाही, तर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्या.
केवळ स्वतःपुरता विचार न करता समाजातील वंचित घटकांसोबत आपला आनंद वाटून घेण्याच्या राहुल साबळे यांच्या या निर्णयाचे सध्या सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे. त्यांचा हा उपक्रम समाजातील प्रत्येकासाठी नक्कीच एक मोठी प्रेरणा आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा