गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील २३ बळींनंतर प्रशासन हादरले! बारामतीत अवैध दारूभट्ट्यांवर पोलिसांचा ‘जेसीबी’ स्ट्राईक
वाघळवाडी-कन्नडवस्तीत पोलिसांची धडक कारवाई; अनेक वर्षांची दारूभट्टी जमीनदोस्त, दारू अड्ड्याकडे जाणारा रस्ता उखडला, टपऱ्या आणि शेड उद्ध्वस्त, अवैध धंदेवाल्यांना कायदेशीर नोटिसा; पुन्हा व्यवसाय सुरू केल्यास थेट कारवाईचा इशारा.

0
7
0
3
9
6
बारामती: पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात विषारी दारूने तब्बल २३ जणांचे बळी घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची राज्य शासनाने तातडीने दखल घेतल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलाने अवैध दारू धंद्यांविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम उघडली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात अवैध हातभट्ट्यांवर पोलिसांचा बडगा कोसळला असून, वडगाव निंबाळकर पोलिसांनी वाघळवाडी (ता. बारामती) हद्दीत थेट जेसीबी लावून अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारूभट्टी मुळासकट उद्ध्वस्त केली आहे.

पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर वरिष्ठ पातळीवरून आलेल्या ठोस आदेशांमुळे बारामती तालुका, माळेगाव आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. पिढीजात आणि अनेक वर्षांपासून छुप्या मार्गाने सुरू असलेल्या हातभट्ट्या आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.
वाघळवाडी ग्रामपंचायत ता.बारामती हद्दीतील कन्नडवस्ती येथे पाटबंधारे विभागाच्या जागेत, नीरा डावा कालव्यालगत वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे गावठी दारूची निर्मिती आणि विक्री सुरू होती. या दारूधंद्यांमुळे परिसरात गुन्हेगारी वाढून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. वाघळवाडी ग्रामसभेने हे धंदे बंद करण्यासाठी ठराव करत पोलिसांशी पत्रव्यवहारही केला होता. अखेर, विषारी दारूच्या बळींनंतर संतप्त ग्रामस्थ आणि आक्रमक झालेले वडगाव निंबाळकर पोलीस यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह या अड्ड्यावर सनसनाटी छापा टाकला.




