गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
सार्वजनिक ठिकाणी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला माळेगाव पोलिसांकडून अटक

0
8
8
1
0
7
माळेगाव (बारामती) : सार्वजनिक ठिकाणी हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणावर माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. तन्मय बापूराव गुळीक (वय २५ वर्षे, रा. मेडद, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ०६ सप्टेंबर २०२६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ आणि त्यांचे पथक खाजगी वाहनाने हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका गोपनीय बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की, मेडद गावातील रखुमाई मंदिरासमोरील रस्त्यावर एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.
या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पाहणी केली असता मिळालेल्या वर्णनाप्रमाणे एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील लोखंडी कोयता जप्त केला.
या प्रकरणी आरोपी तन्मय गुळीक याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(अ)(३) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, तसेच पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, अमर थोरात, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे आणि अमोल राऊत यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. अशा प्रवृत्तींवर माळेगाव पोलिसांकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन माळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.



