Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्रापूर पोलिसांची दमदार कारवाई: वढू बुद्रुकमध्ये १००० लिटर गावठी दारूचे रसायन उद्ध्वस्त, आरोपी फरार.

1 0 0 0 1 4

शिक्रापूर (पुणे): शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका बेकायदा गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३० हजार रुपये किमतीचे १००० लिटर कच्चे रसायन उद्ध्वस्त करण्यात आले असून, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी उसाच्या शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही धडक कारवाई २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:३५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

कोरेगाव भीमा पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, वढू बुद्रुक येथील ब्राम्हण ओढ्यामध्ये काटेरी झाडीच्या आडोशाला बजरंग बजेसिंग नानावत हा व्यक्ती विषारी रसायनांचा वापर करून हातभट्टीची दारू तयार करत आहे. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर सपोनी भोसले, पोलीस हवालदार विकास सरोदे आणि त्यांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी आरोपी बजरंग नानावत हा रसायन एकत्र करून दारू तयार करताना आढळून आला. मात्र, पोलिसांना पाहताच तो ओढ्यातून पलीकडे असलेल्या उसाच्या शेतात पळून गेला. पोलिसांनी त्याला नावाने हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सर्व साहित्य तिथेच सोडून फरार झाला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून २०० लिटर मापाचे ३ पांढरे ड्रम, चुलीवरील लोखंडी बॅरल आणि आंबट वासाचे कच्चे रसायन असा एकूण १००० लिटरचा (अंदाजे किंमत ३०,००० रुपये) मुद्देमाल जप्त केला. यापैकी १८० मि.ली. सॅम्पल पुढील तपासासाठी सीलबंद करून उर्वरित रसायन पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आले. मानवी आरोग्यास अपायकारक आणि हानिकारक दारू तयार केल्याप्रकरणी पोलीस हवालदार विकास सरोदे यांच्या फिर्यादीवरून फरार आरोपी बजरंग नानावत (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क), (फ), (ई) नुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे