
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने….
आम्ही रुग्ण हक्क परिषद म्हणून काम करत असताना इतर सर्वच रोगांपेक्षा कॅन्सरची लागण झालेले अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणावर माझ्या संपर्कात आले. बाकी इतर कुठलाही रोग असेल त्यापेक्षा कैक पटीने कॅन्सरने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात झालेली दिसून आली. सुरुवातीला कॅन्सरचे निदान, त्यानंतर ऑपरेशन, ऑपरेशन झाल्यानंतर केमोथेरपीच्या सहा ते बारा सायकल, एक एका केमोथेरपीच्या सायकलसाठी येणारा खर्च ६० हजार ते १ लाख रुपये लोक करतात. त्यानंतर ४० दिवसांचे रेडिएशन या सर्व प्रक्रियेमधून जात असताना कॅन्सर रुग्णांना मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. कॅन्सरच्या रुग्णांचे ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिएशन इत्यादी सर्व प्रकारचे उपचार पूर्ण झाल्यानंतर देखील, रुग्ण घरी गेल्यानंतर दर महिन्याला लागणारे औषध व इंजेक्शनची किंमत ६० ते ७० हजार रुपयांपासून ते दोन लाखापर्यंत जाते.
एकंदरीत ऑपरेशनसाठी येणारा तीन-चार लाख रुपयांचा खर्च, केमोथेरपी साठी लागणारे पाच ते सात लाख रुपये. सद्य-परिस्थितीत इमोनथेरपी नावाची जी उपचार पद्धती आली आहे त्यासाठी लागणारे १५ ते ३० लाख रुपये, रेडिएशन साठी येणारा दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च यामुळे कॅन्सर पीडित रुग्ण हवालदिल झाले आहेत.
कॅन्सर झालाय यामुळे भयभीत होऊन डिप्रेशनमध्ये जाणे स्वाभाविक असू शकते. मात्र कॅन्सर झाल्यापेक्षा त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च बघून रुग्ण डिप्रेशनमध्ये जात असल्याच्या असंख्य घटना आपल्या आजूबाजूला भोवताली घडताना दिसतात. कॅन्सर झाला म्हणजे पूर्ण प्रक्रिया ४० ते ५० लाख रुपयांपर्यंत जाणार अशी सत्य वास्तववादी परंतु अत्यंत बिकट परिस्थितीमधून रुग्ण जगण्याच्या लढाई बरोबरच कुटुंब किंवा संसार चालवण्याची धडपड करताना दिसतात.

कॅन्सर रुग्णांसाठी असलेले उपचार जीवन संजीवनी मिळवून देणारे असले तरी त्यासाठी लागणारा खर्च लक्षात घेता ही उपचारांची जीवन संजीवनी फक्त पैसेवाल्या श्रीमंत माणसांनाच मिळते का? सर्वसामान्य- मध्यमवर्गीय स्वाभिमानी माणूस, किंवा कधीच कोणापुढे हात न पसरणारा माणूस इतके पैसे उभे करणार कसा? यामधून उपचार अर्धवट थांबवावे लागणे आणि त्यामुळे कॅन्सर रुग्ण मृत्युमुखी पडल्याच्या अनेक दुर्दैवी घटना समाजात ठीक ठिकाणी घडताना दिसतात.
रुग्ण हक्क परिषदेच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देणे. शासकीय योजनांच्या माध्यमातून कॅन्सरवरील संपूर्ण उपचार, कॅन्सर साठीचे ऑपरेशन शासकीय योजनांच्या माध्यमातूनच पूर्ण करणे, इत्यादींसाठीचे अनुभव रुग्ण हक्क परिषद या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असताना आम्ही घेतले आहेत. अनेक रुग्णांना मदत मिळवून देताना रुग्णांचे पवित्र आशीर्वाद घेत आलेलो आहोत.
कॅन्सरच्या ऑपरेशन साठी कोणती शासकीय योजना वापरावी? केमोथेरपी साठी कुठली शासकीय योजना वापरावी? रेडिएशन साठी कोणती शासकीय योजना वापरावी? औषध इंजेक्शन मोफत किंवा स्वस्त सवलतीच्या दरात कुठे मिळेल? याचे संपूर्ण संशोधन पूर्ण अभ्यास करून आम्हाला कॅन्सर ग्रस्त रुग्णाला कॅन्सर मुक्त करायचेच हा ध्यास मनाशी ठेवून आम्ही रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने “कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान” २०२५-२०३० सुरु केले.
कॅन्सरचे उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातूनच मोफत मिळवून देण्यासाठी पुण्यातील न्यू नाना पेठ येथील होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे मुख्य संचालक डॉ. अमोल देवळेकर आणि शनिवार वाड्याजवळील युनिव्हर्सल हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. अनंत बागुल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त त्यांचे फाईव्ह स्टार असलेले हॉस्पिटल उपलब्ध करून दिले. वैद्यकीय क्षेत्रामधील ‘व्यावसायिकता किंवा धंदेवाईकपणा’ सर्वांच्याच अंगवळणी पडलेला असताना कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानास डॉ. अमोल देवळेकर, डॉ. अनंत बागुल यांनी प्रत्यक्ष कॅन्सरग्रस्तांना बरे करण्यासाठीच्या कामास सुरुवात केली. यासाठी कॅन्सर स्पेशालिस्ट तज्ञ अंकोलॉजिस्ट, शल्य चिकित्सक तथा शल्य विशारद (ओंकोसर्जन), इतर तज्ञ डॉक्टर्स आणि नर्सेसचा स्टाफ कॅन्सर ग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्यावरील वेदना पुसून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरविण्याचे काम मोठ्या हिमतीने करत आहे.
कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू झाल्यापासून मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड म्हणजेच आमच्या ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष, आमचे ट्रस्टी पुण्यातील उद्योजक आशिष गांधी, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे- साठ्ये, आमचे प्रमुख समन्वयक राजाभाऊ कदम, सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते इकबालभाई शेख, आमचे संचालक तथा माजी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता पाटील मॅडम आणि जान महम्मद पठाण साहेब, कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानातील सहकारी राहुल हुलावळे, डॉ. स्मिता भोयार, डॉ. अमोघसिद्धी भांडारकर, डॉ. विशाल पवार यांनी झोकून देऊन मन लावून कॅन्सरग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू केले, ही बाब या अभियानाची केंद्रबिंदू ठरली आहे.

कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत 9850002204 – 7 या दोन्ही नमूद फोन नंबर्स वर दिवसभर फोन येत असतात. फोनवरून माहिती घेणाऱ्या कॅन्सर रुग्णांना दर बुधवारी सायं. ४ ते ८.३० वाजेपर्यंत बाह्य रुग्ण विभागामध्ये (OPD) मोफत तपासणी केली जाते. ओंको फिजिशियन कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, रिपोर्ट पाहिल्यानंतर, तद्नंतर काही चाचण्या केल्यानंतर रुग्णांना ऍडमिट करून घेतले जाते. ज्या कॅन्सरग्रस्तांची शस्त्रक्रिया करायची असेल त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठीची तारीख, वार, वेळ दिली जाते. कॅन्सरच्या विविध उपचार पद्धती जसे की, केमोथेरपी करणे किंवा इमोनोथेरपी करणे किंवा औषध गोळ्या लिहून देणे इत्यादी काम बुधवारच्या ओपीडीचे दिवशी संपूर्णपणे नि:शुल्क केले जाते. बाहेर ठिकाणी ज्या गोष्टीसाठी तीन ते पाच हजार रुपये खर्च येतो तीच बाब या ठिकाणी कॅन्सर मुक्त अभियान अंतर्गत सर्वर्थाने मोफत मिळते.

रुग्ण हक्क परिषदेच्या सर्व स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या कडून कॅन्सर रुग्णांमध्ये मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जनजागृती करण्यात येते. शासकीय योजनांची माहिती दिली जाते. शासकीय योजना मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची यादी जाहीर केली जाते. कॅन्सर ग्रस्त रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे.
कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान १४ जानेवार २०२५ रोजी सुरू करण्यात आले. पहिल्या पंधरा दिवसातच एक हजाराहून अधिक रुग्णांनी यासाठी नोंदणी केली. यावरूनच कॅन्सरचे समाजात असलेले भयानक व विदारक चित्र स्पष्ट होते. कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कॅन्सर ग्रस्त रुग्णांचा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे सर्व कार्यकर्ते, युनिव्हर्सल हॉस्पिटल व होप हॉस्पिटलचे सर्वच डॉक्टर्स कर्मचारी व अधिकारी आणि रुग्ण हक्क परिषदेचे सर्व स्वयंसेवी कार्यकर्ते व पदाधिकारी कटिबद्ध राहून निस्वार्थीपणे आपली भूमिका बजावत आहेत.
कॅन्सरची शस्त्रक्रिया, केमोथेरपी- इमोनोथेरपी आणि औषधोपचार मिळविताना इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये निर्धन गरीब व सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांना मिळणारी वागणूक आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत नोंदणी केलेल्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना मिळणारी माणुसकीची वागणूक कॅन्सरग्रस्तांच्या आयुष्याची दोरी बळकट करताना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कॅन्सर रुग्णांची जात-पात-धर्म-लिंग विसरून रुग्णांची व्यथा-वेदना लक्षात घेऊन रुग्ण हक्क परिषदेच्या कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाने पुढे केलेला ‘माणुसकीचा’ हात कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच विलक्षण समाधान निर्माण करताना दिसत आहे.
कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानात आपण सुद्धा तन – मन – धनाने साथ द्यावी, रुग्णांच्या मदतीच्या दिलासादायक व प्रेरणादायी कार्यात आपण देखील सहभागी व्हावे, हीच आपणास नम्र विनंती!
अधिक माहितीसाठी
कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत रुग्णांना नाव नोंदणीसाठी संपर्क- 9850002204, 9850002207
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा