Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रविशेष लेख

बारामतीच्या ‘जनता दरबार’ चा दादा कोण?

0 1 4 5 7 0
विशेष लेख…..

खरंतर माहोल दिवाळीचा आहे, नुकताच पाऊस संपून धुक्याचे वातावरण तयार झालेले आहे थंडीचा मंद गारवा अंगाला जाणवायला लागला आहे दिवाळी सणाची चाहूल दिसायला लागली आहे लोक येणाऱ्या सणासाठी प्रसन्न मनाने सण साजरा करण्यासाठी तयार आहेत.

पण याच दरम्यान महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे व प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे,बारामती विधानसभा मतदारसंघात वारे नव्हे तर वादळ निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे किंवा तयार करण्यात आली आहे. संपूर्ण राज्याचे या विधानसभा क्षेत्राकडे लक्ष लागून आहे,राजकीय तर्क वितर्कांना अगदी उधाण आले आहे.

या उधाणलेल्या परिस्थितीवर समाज माध्यमातून तर रोजच काही ना काही ऐकायला वाचायला मिळत असते पण आज काही नवीन ऐकायला मिळते का या विचाराने निघालो, एक उत्सुकता म्हणून सहज जनतेत जाऊन प्रतिक्रिया घ्यावी म्हणून बाहेर पडलो,

वाटेत एक काका भेटले,

काकांना विचारले काका बारामतीच्या सध्याच्या परिस्थितीवर तुमचे काय मत आहे?

वस्तुस्थिती अशी आहे तालुक्यातील बोटावर मोजण्या इतकी लोकं शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत तालुक्यातील बहुतांश लोकं ही शेती करणारी आहेत आठवड्यातील दोन दिवस अगदी बगळ्यासारखी पांढरी शुभ्र स्वच्छ कपडे घातलेली लोकं इतर दिवशी मात्र काळ्यामातीत हातपाय घालून राबत असतात आणि शेती करत करत आपली उपजीविका साधत आहेत.

मागील शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी पासून तालुक्यात मराठी शाळांचे अस्तित्व आजही टिकून आहे व आजही सुस्थितीत त्या शाळा चालू आहेत, याचाच अर्थ तालुक्यात निरक्षरांचे प्रमाण खूप कमी आहे आणि तशीही लोक आज स्मार्ट जमान्याचा स्मार्टफोन वापरत आहेत. त्यावर रशिया युक्रेन मध्ये काय परिस्थिती आहे हे नाही समजले तरी चालते पण आपल्या स्थानिक पातळीवर आणि राज्याच्या राजकारणात काय चालू आहे याचे नक्की भान असते.

काकांना विचारलेल्या प्रश्नाचा मुद्दा सोडून विषयांतर एवढ्यासाठी केले की मला भेटलेले काका फक्त एक शेतकरी नव्हते तर ते एक सुज्ञ, जाणकार,तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीसह राजकीय परिस्थितीवर भुतकाळ व भविष्यातील गोष्टींवर विश्लेषण करणारे होते.

हा लिहिण्याचा खटाटोप करण्याची प्रेरणाही कदाचित त्यांच्यामुळेच मिळाली असावी.

असो…

मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना काकांनी बोलायला सुरुवात केली, खरंतर काका हाडामासाने आणि रक्ताने शेतकरी असल्याने त्यांनी शेतकरी उदाहरणातून बारामतीत एकमेकांविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत उदाहरण दिले,

काका बोलले साहेब,आम्ही पडलो शेतकरी, आम्ही शेतीची मशागत करताना असेल किंवा बैलगाड्यांच्या शर्यतीत बैलाची जोडी लावायची असेल आम्ही खूप विचारपूर्वक जोडी लावतो, शेतीत एका बैला सोबत दुसरा बैल जोडतानाही विचार करूनच जुपत असतो हे यासाठी की जुन्या अनुभवी ताकतीच्या बैला सोबत नवख्या बैलाचे नुकसान व्हायला नको किंवा नवख्या बैलामुळे जुन्या अनुभवी बैलाचे नुकसान व्हायला नको.

ऐकलेल्या उदाहरणावरून माझी उत्सुकता अजूनच ताणली गेली.

काकांच्या उदाहणाचा मतितार्थ चटकन माझ्या लक्षात आला.

काका पुढे बोलले जर बैलांचे राखणदार म्हणून आम्ही एवढा विचार करत असेल तर जे स्वतःला इतके वर्ष शेतकरी म्हणून घेत आहे त्यांनी बारामतीचे राजकारण करत असताना जोडीचा विचार करायला हवा होता.

त्यांच्या बोलण्यातला रोख माझ्या लक्षात आला होता

आता काकांमधला शेतकरी, नागरिक,आणि एक मतदार जागा झाला होता.

काकांनी बोलायला सुरुवात केली,

मतदार संघात मोठ्या साहेबांचे विचार प्रमाण मानणारा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात होता पण काळानुसार, परिस्थितीनुसार,आणि विचारानुसार आता तो कमी झाला आहे, खरंतर त्यांच्या काळातील त्यांच्या साथीची लोकं आता राहिली नाहीत, वेळ बदलत असते काळ बदलत असतो योगायोगाने विचारही बदलत असतात

असेच काहीसे सध्या घडत आहे,

नवीन व तरुण विचारांनी आता आपल्या विचारांची साथ द्यायची असा मागील काही वर्षात विचार करून बारामतीसाठी एक नेतृत्व मान्य केले होते व ते आज तागायात मान्य आहे

मोठ्या साहेबांचे कार्य कर्तुत्व सर्वमान्य आहेच व ते कोणी नाकारू शकत नाही पण आयुष्याच्या वाटेवर राजकारण समाजकारण करत असताना कौटुंबिक तसेच सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना माणसाने कुठेतरी थांबायचे असते हा प्रगल्भ विचार एवढा मोठ्या व्यक्तीच्या लक्षात का येत नाही ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

काकांना मी मध्येच थांबवलं, काका बोलले आता तुम्ही थांबा मला माझं बोलणं पूर्ण करू द्यावे.

मी म्हणालो ठीक आहे.

काकांनी पुढे सांगायला सुरुवात केली.

फक्त आपला बारामती तालुकाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे समाजमन कळलेलं नेतृत्व म्हणजे अजित दादा पवार आहे, दिवसाचे पंधरा सोळा तास सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्याचे आव्हान पेलणारा एकच माणूस सातत्याने गेली तीन दशके बारामती सह महाराष्ट्रात आपलं नेतृत्व सिद्ध करत आहे व केले आहे.

आपल्या प्रत्येक कृतीतून, निर्णयातून त्याचा मंत्रालयापासून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रत्येक जनमानसावर कसा प्रभाव पडेल याची जाण असलेला नेता म्हणजे अजित दादा.

आपल्या आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा शेतकरी-कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणारा, धडाडीने काम करणारा आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करत आपली नैतिक जबाबदारी लिलया पेलणारा एकच नेता म्हणजे अजितदादा.

बारामतीच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाळ ओळखून

त्यांच्या विकासाला नेहमी चालना देण्यासाठी त्यांनी वेगवेगळे दूधसंघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून अनेक पदे भूषविली असतील पण हि जबाबदारी पार पाडत असताना ही माझा मतदारसंघ माझ्या मतदार संघातील लोकं व इथला शेतकरी व त्याचा सर्वांगीण विकास हे एकच ध्येय ठेवून आजपर्यंत दादांनी काम केले आहे व करत आहेत.

राज्यातील इतर तालुक्यांना पाहायला मिळत नाहीत अशा मोठमोठ्या इमारती, शासकीय कार्यालये,शैक्षणिक संस्था महाविद्यालये, गोरगरिबांच्या आरोग्यसेवेसाठी दवाखाने,

बारामती शहरासह ग्रामीण भागातील अगदी शेतात असलेल्या वाड्यावर वस्त्यांवर पोहचण्यासाठी रस्ते रस्त्यांवरील ठिकठिकाणचे पुल, आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्नशील असणारा नेता म्हणजे अजित दादा.

एवढेच काय स्वतः मधली धार्मिक भावना जागृत ठेवून कधीही जातीपातीचे राजकारण न करता समाजातील विविध जाती-धर्मांच्या मंदिरांसाठी, समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून त्या त्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत.

खासदार,आमदार, राज्यमंत्री, अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांतील मंत्रीपदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद अगदी ४ वेळा भूषविण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वाला लाभला आहे.

अजित पवार यांनी बारामती तालुक्याचा पूर्णपणे कायापालट केला आहे तसेच बारामती शहराची त्यांनी नवीन ओळख तयार करून दिली आहे.

अजित पवार हे तापट स्वभावाचे आहेत त्यांच्या बोलण्याची शैली कडक व तडफदार आहे त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. दादा कधी काय बोलून जातील हे कोणालाच काही कळत नाही.

त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे जर त्यांच्याकडे एखादा माणूस काम घेऊन गेला आणि जर काम होत असेल तर ते हो म्हणून सांगणारा जर काम नसेल होत तर ते नाही म्हणून स्पष्ट पणे तोंडावर सांगणारा लोकनेता म्हणजे अजित दादा, कोणाचंही काम पूर्ण होणार असेल तर हो अन्यथा नाही असं स्पष्टपणे सांगण्याची कार्यपद्धती अजितदादांची ओळख आहे.

कितीही रागीट, तापट असला तरी जनतेला हवा हवा असलेला एकच नेता म्हणजे अजित दादा..

लोकभावना जाणून घेण्यासाठी, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी फक्त जनतेचीच नव्हे तर व्यापार उद्योग यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांच्या किंवा इतर कोणत्याही समस्यांसाठी दादा आपल्या सहयोग सोसायटीतील बंगल्यात वेळात वेळ काढून अखंडपणे ‘जनता दरबार’च्या माध्यमातून सत्ता असो वा नसो कायम बारामतीकर जनतेच्या संपर्कात असतात.

गतीमान प्रशासनासाठी ते नेहमीच आग्रही असतात. प्रत्येक काम हे वेळेत व अचूक व योग्य पद्धतीनेच व्हायला हवे हा अट्टाहास एक राजकारणी म्हणून फक्त दादाच करू शकतात सरकारसह प्रशासनावरही प्रचंड वचक व ताबा असणारे राज्यातील एकमेव नेतृत्व म्हणजे अजितदादा.

खरंतर आपल्या लाडक्या नेत्याचे तोंड भरून कौतुक करत असताना काकांची छाती अभिमानाने मोठी झाली होती. आपल्या नेत्याबद्दलची तळमळ नेत्याबद्दलचा अभिमान व नेत्याबद्दलचे प्रेम मला स्पष्टपणे जाणवत होते.

काकांनी आता थोडी विश्रांती घेतली होती याच संधीचा फायदा घेत काकांना मी पुढचा प्रश्न केला.

पण काका, बारामतीचा पुढचा आमदार (दादा) कोण असेल?

काका बोलले,

साहेब,

हा देश संविधानावर चालतो प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे,विचार स्वातंत्र्य आहे,मतदानासारखा मौलिक अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या विवेकाने निर्णय घेऊन मतदान करत असतो.

आत्ताची जनता ही फार सुज्ञ आहे

राजकारण्यांसाठी जनता महत्त्वाची असते पण आजची जनता आपल्यासाठी कोणता राजकारणी, कोणता लोकनेता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे हे जाणते.

जनता (मतदार) योग्य विचार करून आपला अधिकार बजावतील व तुम्हाला याचे उत्तर मिळेल.

एवढं बोलून काकांनी माझा निरोप घेतला.

मी सुद्धा काकांना मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद बोलून परतीच्या मार्गावर निघालो.

काकांच्या एकूण संभाषणामधून काकांच्या मनात नक्की काय आहे हे मला स्पष्टपणे जाणवले,

व बारामतीच्या ‘जनता दरबाराचा’ दादा कोण असावा या माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.

राज्यातील कोणताही लोकप्रतिनिधी निवडून देत असताना जनता आपला आपल्या लोकांचा व समाजाचा सर्वांगीण विकास होईल का? हा विचार करून मतदान करत असते आणि जर का त्या लोकप्रतिनिधीने आपले कर्तव्य,जबाबदारी पूर्ण केली तर जनता नेहमी अशा लोकप्रतिनिधीला डोक्यावर घेत असते.

लेखन…..

श्री.अडागळे सुशीलकुमार विलास

वडगांव निंबाळकर ता.बारामती जि.पुणे

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे