Breaking
महाराष्ट्र

गड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनाच्या प्रचारासाठी ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्यांशी आपले भावनिक नाते- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

0 1 4 5 7 0
पुणे, दि.२२ : साडेतीनशे वर्षानंतरही सर्वांना ऊर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्यांशी आपले भावनिक नाते जोडले गेले आहे. ही ऊर्जा युनेस्कोलाही भावली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ल्यांच्या नामांकनाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धेचे आज सकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ. दिवसे बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सहायक नियोजन अधिकारी गणेश दाणी, दिनेश काळे आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, जगात अनेक किल्ले आहेत, अनेक राजे होऊन गेले. पण छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास, स्फूर्ती आणि प्रेरणा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक भावनेत डोकावते आहे. युनेस्कोने भारतातील १२ किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत. त्यापैकी राज्यातील ११ किल्ले असून पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड हे तीन किल्ले आहेत. हे सर्व गड किल्ले आपणास वारसा नामांकनात आणायचे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख जगाला व्हावी, म्हणून हा खटाटोप सुरू आहे. किल्ल्यांचे महत्त्व काय आहे. आपण गड किल्ल्यांचे संवर्धन कसे करत आहोत आणि सांस्कृतिक वारसा कसा जपत आहोत, याची माहिती युनेस्कोसमोर प्रदर्शित करायची आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीनही किल्ल्यांची जीएसआय कोड द्वारे मॅपिंग स्टोरी तयार केली आहे.

यूनेस्कोची समिती २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ल्यांना भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार श्री. शिरोळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड किल्ले वारसा नामांकनासाठी निवडले आहेत याचा खूप आनंद वाटत आहे. जिल्ह्यातील तीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आमदार निधीतून मदत करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘चला होऊ जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार’ मोहिमेअंतर्गत आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ फर्ग्युसन महाविद्यालय येथे करण्यात आला. बीएमसीसी रस्ता- सेनापती बापट रस्ता- कुसाळकर रस्ता-दीप बंगला चौक- कॅनाल रस्त -एफसी रस्ता मार्गे फर्ग्युसन महाविद्यालय येथे या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या तीन विजेत्यांना श्री. इंदलकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी शिवकालीन दुर्मिळ शास्त्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे