Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अजितदादांच्या अपघाताचे ‘राजकारण’ की वारसदार होण्याचा ‘खटाटोप’? रोहित पवारांच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह!

0 6 2 9 0 8

बारामती: २८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असतानाच, गेल्या काही दिवसांपासून या अपघाताच्या चौकशीवरून सुरू असलेले राजकारण आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. विशेषतः आमदार रोहित पवार ज्या पद्धतीने या प्रकरणात आक्रमक झाले आहेत, त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

रोहित पवार २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात DGCA आणि ‘व्हीएसआर’ विमान कंपनीविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर, पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्याशी त्यांची झालेली शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरली. मुंबईत दाद न मिळाल्याने त्यांनी बारामती गाठली, पण तिथेही त्यांना विशेष प्रतिसाद मिळाला नाही. एका आमदाराला दोन जिल्ह्यांच्या पोलिसांनी ‘भाव’ न देणे, ही रोहित पवारांची राजकीय नाचक्की आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत हा अपघात असल्याचे स्पष्ट केले होते. “यामागे कोणतेही राजकारण नाही, ही केवळ एक दुर्दैवी घटना आहे,” असे आवाहन त्यांनी केले होते. असे असतानाही रोहित पवार आपल्याच आजोबांचा शब्द खोडून काढत आहेत का? शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा वेगळी चूल मांडून रोहित पवार नक्की काय साध्य करू पाहत आहेत, हे कोडे कार्यकर्त्यांना पडले आहे.


अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ आणि जय पवार हे या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना आणि संयम बाळगून असताना, रोहित पवार मात्र सर्वात जास्त सक्रिय दिसत आहेत. ज्या कुटुंबाचे थेट नुकसान झाले आहे, ते सदस्य कोठेही तक्रार करताना दिसत नाहीत, मग रोहित पवार कोणाच्या विश्वासावर हे ‘धाडस’ करत आहेत? अजितदादांच्या वारसांना डावलून स्वतःचा राजकीय पाया रचण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अजित पवारांनी गेल्या ३५-४० वर्षांत शून्यातून आपले नेतृत्व उभे केले. पहाटे ५ वाजल्यापासून सुरू होणारा त्यांचा जनसंपर्क आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे ते ‘दादा’ बनले. मात्र, रोहित पवार केवळ ३० दिवसांच्या आक्रमकतेने अजितदादांची जागा घेऊ पाहत असतील, तर ते तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे.

“सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला, ४० वर्षांच्या संघर्षातून तयार झालेली जागा इतक्या सहज घेता येणार नाही,” अशी चर्चा बारामतीच्या कट्ट्यांवर सुरू आहे.

रोहित पवार सध्या जो काही खटाटोप करत आहेत, त्यामागे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची घाई दिसते. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी ते स्वतःला ‘बारामतीचा पुढचा चेहरा’ म्हणून प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कुटुंबाला विश्वासात न घेता किंवा त्यांच्या भावनांचा विचार न करता सुरू असलेला हा ‘स्टंट’ त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राचे तडफदार नेते होते. त्यांच्या अपघाताबद्दल शंका उपस्थित करणे हा जर तपासाचा भाग असता तर यंत्रणांनी काम केले असते. पण रोहित पवारांनी ज्या पद्धतीने या घटनेचे भांडवल सुरू केले आहे, त्यावरून ते जनसेवेपेक्षा स्वतःच्या राजकीय प्रतिमेसाठी अधिक प्रयत्नशील आहेत असेच चित्र दिसत आहे. बारामतीची जनता वारसदार म्हणून कोणाला स्वीकारते, हे काळच ठरवेल; पण सध्या तरी रोहित पवारांची ही आक्रमकता लोकांच्या मनात आदरापेक्षा प्रश्नचिन्ह अधिक निर्माण करत आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे