Breaking
अपघातअभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान संपन्न; “अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन काळाची गरज” – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान उत्साहात; वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

0 6 2 9 0 5

बारामती,सोमेश्वरनगर: वाहन चालवताना होणारी बेफिकिरी आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष हेच अपघातांचे मुख्य कारण आहे. परदेशात आपण नियमांचे काटेकोर पालन करतो, मात्र आपल्या देशात त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Dy. RTO) श्री. सुरेंद्र प्रकाश निकम यांनी केले.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियम” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. निकम यांनी रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, हेल्मेटचा वापर न करणे, अतिवेगाने वाहन चालवणे आणि नियमांचे उल्लंघन करणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. सध्या तंत्रज्ञान प्रगत झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नियम तोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास आता त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाते, अशी ताकीदही त्यांनी दिली.

अपघात झाल्यास किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा आणि वैद्यकीय मदतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. संजू जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अनिल शेलार, श्री. गोरखनाथ बोऱ्हाडे आणि श्री. किशोर विलास शेळके (स्वामी) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (बी–०२१) कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. नारायण राजूरवार यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे