शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात एका थरारक आणि धक्कादायक घटनेत घराबाहेरील ओट्यावर झोपलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार कोयत्याने गळा चिरून खून करण्यात आला. जुन्या वादाचा आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाने हा रक्तरंजित सूड उगवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या ३६ तासांत या अंधाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

बाळासो बबन तांबे (वय ४३, रा. रानमळा, वरूडे, ता. शिरूर) असे खून झालेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरूडे येथील रानमळा परिसरात राहणारे बाळासो तांबे हे उकाडा होत असल्यामुळे ८ जून रोजी रात्री घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास दबा धरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने झोपेत असलेल्या तांबे यांच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी त्यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण वरूडे गावात एकच खळबळ उडाली आणि परिसरात भीतीचे सावट पसरले.
घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी मयताच्या पार्श्वभूमीचा अभ्यास सुरू केला. त्यांचे पूर्वीचे वाद, गावातील संबंध, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सुई गावातीलच एका अल्पवयीन मुलाकडे वळली.
पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांसमक्ष कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या मुलाने अखेर पोलिसांसमोर गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली. दोन वर्षांपूर्वी तांबे यांच्यासोबत झालेले भांडण आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेली शिवीगाळ व दिलेल्या धमकीचा राग आरोपीच्या मनात सलत होता. याच जुन्या वादाचा व अपमानाचा सूड घेण्याचे त्याने ठरवले. ८ जून रोजी रात्री तांबे ओट्यावर एकटेच झोपल्याची संधी साधून त्याने कोयत्याने वार करत त्यांचा जीव घेतला.
कोणताही सुगावा नसताना केवळ तांत्रिक तपास आणि अचूक माहिती संकलनाच्या जोरावर ३६ तासांत आरोपीला जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, महेश डोंगरे, श्रेणी फौजदार जितेंद्र पानसरे तसेच एलसीबीचे जनार्धन शेळके, राजु मोमीन, तुषार पंदारे, संजु जाधव, सागर धुमाळ आणि शिक्रापूर पोलीस स्टेशनचे विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अमोल नलगे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव, मध्येचिंद्र निचीत यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा