Breaking
अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जेजुरीच्या दुर्दैवी घटनेने उघड केले ‘केमिकल भंडाऱ्या’चे भयावह सत्य; भाविकांच्या जीवेशी खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश!

0 5 8 5 3 5

जेजुरी: खंडोबाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीत आज आनंदाच्या क्षणाचे रूपांतर आक्रोशात झाले. निवडणूक विजयाचा जल्लोष करत असताना उधळलेल्या भंडाऱ्याचा अचानक स्फोटक भडका उडाला आणि त्यात नवनिर्वाचित नगरसेवकांसह १६ जण गंभीर जखमी झाले. या घटनेने केवळ जेजुरीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, देवाच्या नावाने विकल्या जाणाऱ्या ‘भेसळयुक्त आणि घातक केमिकल भंडाऱ्या’चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मल्हार नाट्यगृहात मतमोजणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक आणि समर्थक गडाच्या पायरीवर नतमस्तक होण्यासाठी गेले होते. दुपारी ३ च्या सुमारास पायरीवर भंडारा अर्पण करताना अचानक आगीचा लोळ उठला. हा भडका इतका भीषण होता की, तिथे उपस्थित १६ जण आगीच्या विळख्यात सापडले. यामध्ये दोन महिला नगरसेविकांचाही समावेश आहे. नैसर्गिक हळदीचा असा स्फोटक भडका उडणे अशक्य असल्याने, या भंडाऱ्यात अत्यंत ज्वलनशील रसायने असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत जेजुरीसह अनेक तीर्थक्षेत्रांवर भंडाऱ्याचा काळा बाजार फोफावला आहे. यामागचे अर्थकारण आणि फसवणूक अत्यंत धक्कादायक आहे.

कमी दरात अधिक नफा,शुद्ध हळदीचा दर बाजारात २०० ते ३०० रुपये प्रति किलो आहे. मात्र, गडावर किंवा पायथ्याशी मिळणारा भंडारा कमी दराने विकला जातो. स्वस्त दरात शुद्ध हळद मिळणे अशक्य आहे, हेच या भेसळीचे मुख्य कारण आहे.

व्यापारी अधिक नफा कमवण्यासाठी निकृष्ट दर्जाची पिठी, लाकडाचा भुसा, किंवा तांदळाची कणी यांचा वापर करतात.

या मिश्रणाला गडद पिवळा रंग आणण्यासाठी ‘लेड क्रोमेट’ (Lead Chromate) आणि इतर स्वस्त इंडस्ट्रियल रंगांचा वापर केला जातो.

 चकाकी आणण्यासाठी आणि हवेत सहज उधळला जावा म्हणून त्यात काही ज्वलनशील पावडर (Flammable Powder) किंवा अभ्रकासारखे पदार्थ मिसळले जातात. हेच पदार्थ आगीच्या संपर्कात आल्यावर पेट्रोलसारखा भडका घेतात.

अनेक दुकानदार “हा खास गाभाऱ्यातील भंडारा आहे” असे सांगून भाविकांच्या माथी घातक रसायने मारतात. पॅकिंगवर किंवा स्वतः भंडारा वजन करून देत असताना त्यावर कोणत्याही घटकांचा उल्लेख नसतो, आणि भक्तीपोटी भाविकही प्रश्न विचारत नाहीत.

जर या भेसळयुक्त भंडाऱ्यावर वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात मोठे संकट ओढवू शकते,

भेसळीसाठी वापरले जाणारे कृत्रिम रंग आणि रसायने त्वचेसाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे ‘स्किन ॲलर्जी’, पुरळ उठणे आणि दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

 भंडारा उधळताना तो श्वासावाटे शरीरात जातो. केमिकल पावडर फुफ्फुसात जमा झाल्यास दमा, खोकला आणि फुफ्फुसाचे गंभीर विकार होऊ शकतात.उधळलेला केमिकल भंडारा डोळ्यात गेल्यास दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, अंधत्व येण्याची भीती असते.

 आजचा चा भडका ही धोक्याची घंटा आहे. यात्रा काळात लाखो भाविक जमतात, त्यावेळी जर असा भडका उडाला तर चेंगराचेंगरी आणि आगीत शेकडो लोकांचे बळी जाऊ शकतात.

आजच्या घटनेवरून प्रशासकीय पातळीवर किती उदासीनता आहे हे दिसून येते,जीव गेल्यावरच जाग येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ही समस्या नवीन नाही. सुमारे आठ महिन्यांपूर्वी जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन या ज्वलनशील भंडाऱ्याबाबत पुरावे सादर केले होते. त्यावेळी कारवाईची मागणी झाली, मात्र प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवले. “जर त्यावेळीच कडक कारवाई झाली असती, तर आज १६ जणांवर ही वेळ आली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

या घटनेचे गांभीर्य ओळखून नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी तातडीने भूमिका घेतली आहे. “घटलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. शहरात विक्री होणाऱ्या भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईसाठी नगरपालिका विशेष पथक नेमेल आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

जेजुरीच्या खंडोबावर श्रद्धा ठेवणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळण्याचा हा प्रकार अक्षम्य आहे. आता तरी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलीस प्रशासन या भेसळ करणाऱ्या रॅकेटच्या मुळाशी जाणार का? की पुन्हा एकदा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? हाच खरा प्रश्न आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे