गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
‘नशा’ ठरली जीवघेणी! पार्टी रंगात आली, वाद पेटला आणि मित्रांनीच मित्राचा दगडाने ठेचून केला खून; बारामती हादरली

0
6
9
0
4
0
बारामती : मैत्री, पार्टी आणि दारूचा प्याला… या आनंदात सुरू झालेली एक रात्र बारामतीत रक्ताच्या थारोळ्यात संपली. “मैत्रीत सर्व काही माफ असतं,” असं म्हणतात, पण दारूची नशा बुद्धीवर हावी झाली की माणूस पशू कधी होतो, हे कोणालाच समजत नाही. बारामतीतील जुना मोरगाव रस्त्यावरील वेताळबाबा मैदानात १४ डिसेंबरच्या काळोख्या रात्री असाच एक थरार घडला. केवळ शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन जिवलग मित्रांनीच तिसऱ्या मित्राचे डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली. अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर नशा उतरताच दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.
रविवार, १४ डिसेंबर २०२५. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. बारामतीतील लेंडीपट्टी परिसरातील वेताळबाबा मैदानाच्या मधोमध गडद अंधार होता. या अंधारात तीन मित्र – अविनाश लोंढे, समीर शेख आणि प्रथमेश दळवी – दारू पिण्यासाठी जमले होते. तिघेही तरुण, रक्ताने गरम आणि त्यात दारूची नशा. गप्पांच्या ओघात दारूचा अंमल चढू लागला.
अचानक गप्पांचे रूपांतर वादात झाले. अविनाशने नशेत समीर आणि प्रथमेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत आणि संतापाच्या भरात समीर आणि प्रथमेशचा संयम सुटला. शब्दाला शब्द वाढला आणि रागाचा पारा चढला. काही कळायच्या आतच दोघांनी जमिनीवर पडलेला दगड उचलला आणि अविनाशच्या डोक्यात निर्दयपणे घालण्यास सुरुवात केली. जोवर अविनाशची हालचाल थांबत नाही, तोवर ते त्याला मारत राहिले. रक्ताच्या थारोळ्यात अविनाश निपचित पडला.
नशा उतरली, वास्तव समजले आणि पोलीस ठाणे गाठले
अविनाशचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच समीर आणि प्रथमेश भानावर आले. दारूची नशा खाडकन उतरली. समोर मित्राचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पळून जाण्याऐवजी, भीती आणि पश्चात्तापाने ग्रासलेल्या दोन्ही आरोपींनी थेट बारामती शहर पोलीस ठाणे गाठले.
पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी थरथरत्या आवाजात कबुली दिली, “साहेब, आमच्या हातून चूक झाली, आम्ही मित्राला मारलं…” पोलिसांनी तातडीने दोघांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळी धाव घेतली. तिथे अविनाशचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी मयत अविनाशचे वडील धनंजय प्रभाकर लोंढे (रा. मळद, शेंडेवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर इक्बाल शेख (वय २५, रा. देवळे पार्क सोसायटी) आणि प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगताप मळा) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अविनाश आणि आरोपी एकमेकांचे परिचित होते. मात्र, क्षुल्लक कारणावरून आणि दारूच्या नशेत झालेल्या या घटनेने एका २० वर्षांच्या तरुणाचा जीव घेतला असून दोन तरुणांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे.
बारामती पोलिसांनी गुन्हा नोंद करून विविध कलमान्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), ३(५) तसेच अॅट्रॉसिटी ॲक्ट (अ.जा.ज.अ.प्र.का.) कलम ३(१)(r), ३(२)(v) गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड हे करीत आहेत.
या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून, तरुण पिढीतील वाढती व्यसनाधीनता आणि त्यातून घडणारे गुन्हे पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनले आहेत.







