Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

खाकीचा थरार! बारामतीत धडाकेबाज कारवाई, बारामतीत पोलिसांच्या नाकाबंदीचा धसका; २.३५ कोटींचा ४७० किलो गांजा सोडून तस्कर फरार

0 6 7 6 9 3

बारामती : होळीच्या उत्सवात अंमली पदार्थांचे विष कालवण्याचा आंतरराज्य टोळीचा मोठा डाव बारामती पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे तस्करांची अशी काही गाळण उडाली की, तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा ४७० किलो गांजा भरलेले ड्रम रस्त्यावरच टाकून आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. बारामती पोलीस दलाच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई मानली जात आहे.

दिनांक २८/०२/२०२६ रोजी बारामती विभागात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी, रात्रगस्त आणि कडक वाहन तपासणीचे आदेश दिले होते.

या मोहिमेदरम्यान पोलीस यंत्रणेने संशयित मार्गांवर आपले जाळे विणले होते. खाकी वर्दीचा हा कडक बंदोबस्त आणि ठिकठिकाणी सुरू असलेली कसून तपासणी पाहून अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले. पोलिसांच्या हाताला लागण्यापेक्षा मालाची विल्हेवाट लावणे त्यांनी पसंत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तस्कर गांजाची मोठी खेप घेऊन बारामतीच्या दिशेने येत होते. मात्र, जळोची-पिंपळी रोड परिसरात पोलिसांची प्रभावी नाकाबंदी असल्याचे पाहून आरोपी घाबरले. पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी मौजे जळोची येथील एका शेताच्या मोकळ्या रानात गांजाचे दोन अजस्त्र ड्रम फेकले आणि तिथून पलायन केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, त्या दोन ड्रममध्ये सुमारे ४७० किलो उच्च दर्जाचा गांजा आढळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत अंदाजे २ कोटी ३५ लाख रुपये इतकी अफाट आहे.

प्राथमिक तपासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, आगामी होळी सणाच्या निमित्ताने बारामती आणि आसपासच्या परिसरात या गांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्याची योजना तस्करांनी आखली होती. मात्र, प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. चिवडशेट्टी आणि त्यांच्या पथकाच्या तत्परतेमुळे तस्करांचा हा मनसुबा धुळीस मिळाला असून एक मोठा अनर्थ टळला आहे.

या धाडसी कारवाईमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात बारामती पोलिसांचे कौतुक होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचूक नियोजनामुळेच ही कामगिरी फत्ते झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

“अंमली पदार्थांविरुद्धचा हा लढा यापुढेही अधिक तीव्र केला जाईल. शहरात कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन बारामती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे