Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

“अवघ्या महिन्याभराचा संसार… अन् रक्ताचा सडा! सुडाच्या आगीत पहिल्या प्रियकराने संपवला प्रेयसीचा पती” संसाराची स्वप्ने बघत असतानाच तरुणाचा निघृण खून; आरोपी फरार

0 6 8 2 1 7

पुणे/सासवड : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हणतात, पण याच प्रेमाचा अतिरेक आणि सूडबुद्धीने एका निष्पाप जिवाचा बळी घेतला आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच ज्याच्याशी प्रेयसीने लग्न केले, त्या पतीचा पहिल्या प्रियकराने अमानुषपणे खून केल्याची थरारक घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली आहे. दिपक गोरख जगताप (वय २२) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.

राजेवाडी (ता. पुरंदर) येथील दिपक जगताप याचा महिन्याभरापूर्वीच पायल यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर हे जोडपे सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून उरुळी कांचन येथे कामाच्या निमित्ताने स्थायिक झाले होते. दिपक एका खाजगी गॅरेजमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र, त्यांच्या या सुखी संसाराला पायलचा पहिला प्रियकर सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, मूळ रा. राहू, दौंड) याची नजर लागली होती.

‘तो’ मोबाईल आणि मृत्यूचा सापळा

सुशांत मापारी याच्या मनात पायलने आपल्याशी संबंध तोडून दिपकशी लग्न केल्याचा प्रचंड राग खदखदत होता. तो सतत दिपक आणि पायलला फोन करून “तुम्ही लग्न का केले?” अशी विचारणा करत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.

शनिवारी (ता. १३) दिपक आणि पायल राजेवाडीला आले असताना, सुशांतने पुन्हा डाव साधला. त्याने दिपकला फोन करून सांगितले, “पायलचा जुना मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा आणि आपण लग्नाचा सर्व वाद मिटवून टाकू.” साध्या मनाच्या दिपकला कल्पनाही नव्हती की, वाद मिटवण्याच्या बहाण्याने त्याला मृत्यूच्या सापळ्यात बोलावले जात आहे.

सुशांतच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दिपक शनिवारी माळशिरस येथे गेला. माळशिरस गावाच्या हद्दीत निर्जन अशा ‘रामकाठी’ शिवारात सुशांत दबा धरून बसला होता. दिपक तिथे पोहोचताच, संवादाऐवजी सुशांतने थेट रक्ताचा खेळ सुरू केला. त्याने आपल्याकडील धारदार लोखंडी कोयत्याने दीपकच्या डोक्यावर, मानेवर आणि पायावर सपासप वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात दिपक तिथेच कोसळला. आपला हेतू साध्य होताच, आरोपी सुशांतने रक्ताने माखलेला कोयता घटनास्थळीच टाकला आणि तेथून पसार झाला.

दिपक शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही आणि त्याचा फोनही बंद लागल्याने नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला. त्यांनी शोधाशोध सुरू केली असता, रविवारी (ता. १४) माळशिरसच्या रामकाठी शिवारात दीपकचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

या प्रकरणी मयत दिपकचे मामा संतोष रोहीदास शेंडकर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि सासवडचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौड यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

जेजुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये सुशांत मापारी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश पाटील आणि त्यांची टीम फरार आरोपीचा शोध घेत आहे.

एकीकडे पतीच्या निधनाने पायलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसरीकडे सूडाच्या आगीत एका तरुणाने स्वतःचे आणि दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आरोपी लवकरच गजाआड होईल, पण दिपकचा जीव पुन्हा येणार नाही, हीच हळहळ व्यक्त होत आहे.

आरोपी सुशांत मापारी अद्याप फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पुढील तपास पोसई महेश पाटील जेजुरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे