ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
विशेष शोध मोहीम: बारामतीत विनापरवाना चालकांचा ‘टाईम मॅनेजमेंट’ गेम; पोलीस वाहतूक विभाग व आरटीओच्या ‘ऑफ-ड्यूटी’ वेळेत ‘यमदूतांचा’ सुळसुळाट!
कचरा आणि दूध वाहतूक करणाऱ्या विनापरवाना चालकांमुळे अपघाताची टांगती तलवार; आरटीओ आणि वाहतूक पोलीस कारवाई करणार का?

0
6
9
0
4
0
बारामती: बारामती तालुक्यात सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या आणि दूध संकलन केंद्रांची वाहने चक्क विनापरवाना (Without Driving License) चालकांकडून चालवली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे चालक व या चालकांना वाहन देणारी यंत्रणा कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या ‘ऑफ-ड्यूटी’ वेळेचा पुरेपूर फायदा घेत असल्याने प्रशासकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तपासात असे समोर आले आहे की, दूध संकलन करणे हे काम सकाळी लवकर किंवा संध्याकाळी होत असते आणि कचरा संकलन करणे हे काम सुद्धा सकाळी व संध्याकाळी होत असते, याच गोष्टीचा फायदा घेत हे विनापरवाना चालक व या चालकांना वाहन ताब्यात देणारी यंत्रणा जाणीवपूर्वक पहाटे, सकाळी लवकर आणि सायंकाळी ५ नंतर ते उशिरा रात्रीपर्यंत वाहतूक करतात. ही वेळ निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या काळात आरटीओ (RTO) आणि वाहतूक पोलिसांची रस्त्यांवर गस्त किंवा नाकाबंदी नसते. प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असताना, कारवाई करण्याची वेळ नसताना हे अननुभवी आणि लायसन्स नसलेले चालक भरधाव वेगाने गाड्या चालवत आहेत.
ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी राबवल्या जाणाऱ्या कचरा गाड्यांवर अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले किंवा परवाना नसलेले तरुण चालक म्हणून दिसतात. अशीच स्थिती दूध संकलन केंद्रांची आहे. वेळेत दूध पोहोचवण्याच्या घाईत नियमांना हरताळ फासला जात आहे. आपल्या गाड्यांवर नेमलेले चालक परवानाधारक आहेत की नाही, याची खातरजमा करण्याची जबाबदारी ग्रामसेवक आणि केंद्र चालकांची नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
विनापरवाना गाडी चालवणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर गुन्हेगारीचा प्रकार आहे. अशा वाहनाकडून अपघात झाल्यास विमा कंपनी क्लेम नाकारते, ज्यामुळे पीडितांना कोणतीही मदत मिळत नाही. केवळ शहरात दंड वसुली करणाऱ्या आरटीओ विभागाला ग्रामीण भागातील हे ‘मृत्यूचे दूत’ का दिसत नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आरटीओ आणि पोलीस वाहतूक विभाग केवळ कार्यालयीन वेळेतच (सकाळी १० ते ६) सक्रिय राहणार का?
सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
पहाटे आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या या अवैध वाहतुकीवर लगाम कोण घालणार?
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अचानक धाड सत्र किंवा तपासणी मोहीम का राबवली जात नाही?
”विनापरवाना वाहन चालवणे हा स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. बारामती आरटीओ आणि शहर-ग्रामीण वाहतूक विभागाने केवळ कार्यालयीन वेळेत मर्यादित न राहता, पहाटे आणि रात्रीच्या वेळी विशेष मोहीम राबवून अशा चालकांवर आणि त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.”
या गंभीर समस्येवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे.



