अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
तीन दिवसांच्या पाठलागानंतर ‘ती’ चारचाकी अखेर ताब्यात, बारामती वाहतूक पोलिसांची कारवाई
काळ्या काचांसह साऊंड सिस्टम उतरविली,दंडात्मक कारवाईसह कोर्टात खटला दाखल; बारामती वाहतूक पोलिसांची कारवाई.

0
6
1
1
9
2
बारामती : मागील तीन दिवसांपासून बारामतीत काळ्या काचा व नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने शहरात भरकटणाऱ्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला आहे.
तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही गाडी ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

२४ मे रोजी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. याच वेळी भिगवण चौकातून काळया काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही आणि वेगाने निघून गेली. यानंतर ती गाडी सिटी इन चौकात थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक पोलीस स्वाती काजळे यांना कळविले. काजळे यांनीही सिटी इन चौकात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण वाहनाने पुन्हा भरधाव वेग घेतला. पुढे, (दि.२८ मे) रोजी तीच गाडी गांधी चौकात वाहतूक पोलीस सीमा घुले आणि रूपाली जमदाडे यांना दिसली, मात्र त्या वेळीही ती थांबवता आली नाही. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान सुधाकर जाधव आणि अजिंक्य कदम यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच परिसरातील नागरिकांची विचारपूस करून संबंधित वाहनाविषयी सविस्तर माहिती मिळवली. अखेर बारामती शहरातच ती चारचाकी शोधून काढण्यात आली आणि पोलिसांनी ताब्यात घेतली. कृष्णा अभिजीत क्षीरसागर रा. माऊली नगर प्रगती नगर रोड बारामती हा चालक ती गाडी चालवत होता आणि त्या गाडीचा वाहन क्रमांक MH 06 AZ 8555 असा असल्याचे तपासात समोर आले.


सदर वाहनावर काळ्या काचा, नंबर प्लेट नव्हती, विमा नव्हता तसेच पोलीस मॅन्युअलनुसार कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नव्हती. यामुळे वाहनचालकावर ३५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, बेदारकारपणे वाहन चालवणे या प्रकरणी कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. सदर गाडीच्या काळया काचा कमी करण्यात आल्या असून खूप मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम सुद्धा काढण्यात आलेली आहे. सध्या सदरची गाडी बारामती वाहतूक शाखा या ठिकाणी डिटेन करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या वाहतूक पथकाने केली.
तसं पाहायला गेलं तर बाब मोठी आहे आणि छोटीही आहे परंतु कायद्याला व पोलिसांच्या आदेशाला न जुमानता,मानता टुकारगिरी करणे असे दिसून आल्याने पोलीसांनी कारवाई केल्याचे सांगितले.

बारामतीत वाहतूक पोलिसांकडून चारचाकी वाहनांवर काळया काचा लावणे,फॅन्सी क्रमांक आणि अतिशय लहान अक्षरात वाहन क्रमांकाची पाटी लावणे अशा वाहनांवर गेल्या पाच दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे.
अशा प्रकारे कोणी आपल्या जवळपास कोणी करत असल्यास,निदर्शनास आल्यास तत्काळ 9923630652 या क्रमांकावर कळवावे,आपण त्यावर त्वरित कारवाई करू असे बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक,श्री.चंद्रशेखर यादव यांनी यावेळी सांगितले.





